धरणगाव ः प्रतिनिधी
समाजकारणाचे ध्येय घेऊन शिवसेनेची वाटचाल सुरू असून यात सर्वसामान्य शिवसैनिकांंना न्याय मिळाला आहे.आपल्याला पक्षाने खूप दिले असून आता पक्षाला देण्याची आवश्यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना भगवा फडकावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.धरणगाव येथील श्रीजी जिनींगच्या परिसरात शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत आयेोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. तर ज्यांच्या विजयासाठी आपण जीवाचे रान केले त्या भाजपच्या खासदारांनी आपल्या विरोधात उमेदवार दिल्याचे सांगत याचे योग्य वेळी उत्तर दिले जाईल असा इशारा देखील दिला.
आपल्या भाषणात गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेची जळगाव ग्रामीणसह जिल्ह्यात मजबूत स्थिती असून आगामी कालखंडातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही पक्षाला चांगले यश लाभणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. तर गद्दारांना धडा शिकवण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी याप्रसंगी दिला.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे होते. प्रास्ताविकात विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर यांनी धरणगाव तालुक्यातील संघटना बांधणी, झालेली विकास कामे व बुथरचनेबाबत विस्तृत माहिती विषद केली.
शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निराधार आरोपांना तात्काळ उत्तर देण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आगामी निवडणुकांची तयारी करून धरणगाव नगरपालिकेवर झेंडा फडकणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेतही पक्षाला यश मिळणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले यांनी अतिशय भावपूर्ण असे भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे फक्त शिवसेना पक्षप्रमुख नसून ते एखाद्या कुटुंबप्रमुखासारखे व संवेदनशील मुख्यमंत्री कसे आहेत याची उदाहरणे देत त्यांनी विविध लोकल्याणकारी योजनांना लागू करण्याची माहिती दिली तेव्हा अनेकांना गहिवरून आले.उध्दवजी हे मातृहृदयी असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, धरणगाव तालुक्यात शिवसेनेची अतिशय मजबूत स्थिती आहे. जिल्ह्यातील पहिला आमदार येथूनच मिळाला असून सुमारे 25 वर्षांपासून येथे शिवसेनेचा आमदार आहे. येथूनच 1996 साली जिल्ह्यातील पहिला नगराध्यक्ष निवडून देण्याचा बहुमान मिळाला आहे. आजही तालुक्यातील जास्तीत जास्त सरपंच, पंचायत समिती आदींसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. आज जिल्ह्यात शिवसेनेचे 5 आमदार व 5 पंचायत समिती सभापती असून झेडपीचे 15 सदस्य आहेत. आगामी काळात पूर्ण शक्ती पणाला लावून जिल्हा परिषदेवर भगवा फडकावणे अशक्य नसल्याचे पालकमंत्री म्हणाले. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. तर याप्रसंगी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका करून त्यांनी देवांना सुध्दा पक्षीय राजकारणात वाटून घेतल्याचा टोला मारला.तर प्रत्येक गावाच्या वेशीवर शिवसेनेचा बोर्ड लावण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्यात.
सूत्रसंचालन उपजिल्हा प्रमुख पी.एम पाटील सर यांनी केले तर आभार उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री यांनी मानले.यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, वक्ते गजानन चव्हाण, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, मुंबईचे निरीक्षक प्रशांत सातपुते, सुमित बने, संतोष चांदे, शांताराम बने, जिल्हाप्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, तालुका प्रमुख गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर,उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, शहर प्रमुख राजेंद्र महाजन,जळगाव महानगर प्रमुख शरद तायडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी,जीवनआप्पा बयास, भरत महाजन, अभिजित पाटील, युवासेनेचे तालुका प्रमुख चेतन पाटील, उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ,पंचायत समितीचे सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, उपतालुका प्रमुख मोतीअप्पा पाटील, राजेंद्र ठाकरे, डी.ओ.पाटील, मुकुंद नन्नवरे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, तत्कालीन नगराध्यक्ष निलेश चौधरी, महिला पदाधिकारी माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, तालुका प्रमुख जनाआक्का पाटील,रत्नाबाई धनगर,अंजली विसावे, हेमांगी अग्निहोत्री, धिरेंद्र पुर्भे, रविंद्र चव्हाण सर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अक्षय मुथा, किशोर पाटील, सर्व नगरसेवक, तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य, शिवसेना, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते.