सूरतच्या हॉटेलमध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या नाराज आमदारांना आता अहमदाबादला पाठवण्यात येणार आहे. अहमदाबादमध्ये ते अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान तत्पूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा हे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी नड्डा यांच्या घरी पोहचल्याचे समजते. दुसरीकडे वर्षावर शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक थोड्याच वेळात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकट अधिक गडद झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे 25 आमदारांसह गुजरातला गेले आहेत. यामध्ये शिवसेनेच्या 15 आमदारांचा समावेश आहे, तर 10 अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. शिवसेनेत सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे शिंदे नाराज झाले असून, काल संध्याकाळपासून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव यांचा फोनही उचलला नाही. मुंबईत शिवसेनेने आज विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिंदे हजर राहणार का? हे पाहावे लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना देखील उधाण आले आहे. सोमवारी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे काही आमदार फुटले असून, भाजपचे सर्व पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर शिवसेनेकडून नाराजी नाट्य सुरू झाले आहे.
