जळगाव ः प्रतिनिधी
केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात सुरक्षित मातृत्व आश्वासक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात ७० सुमन बेसिक, ५२ सीईएमओएनसी आणि ७४ बीईएमओसी असे एकूण १९६ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील दोन उपजिल्हा रुग्णालये, तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व दोन ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. या केंद्रांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती नियुक्त केली आहे.जिल्हाधिकारी हे समिती अध्यक्ष तर शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण हे सदस्य सचिव व संयोजन असणार आहेत.
उपक्रम अंमलबजावणी देखरेखसाठी समिती
उपक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्थांना भेट देणार्या सर्व गर्भवती महिला, नवजात बालकांना मोफत सेवा मिळण्याचा हक्क आहे. तथापि सर्व आरोग्य संस्थांमध्ये सर्व सुविधा पुरवता येत नसल्यास प्रत्येक आरोग्य संस्थेने सध्याच्या संसाधनांच्या आणि सेवा उपलब्धतेच्या आधारे सेवा हमी पॅकेज कळवण्यात येणार आहे. सेवेतील त्रुटी सहा महिन्यात दूर करण्यासाठी उपाययोजनेची मर्यादा देण्यात आली आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य, जिल्हा व संस्थास्तरावरील गुणवत्ता समिती नेमण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तसेच सदस्य सचिव व संयोजक स्थानिक जिल्हा शल्यचिकित्सक हे असणार आहे.
काय आहे ‘सुमन’ उपक्रम
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या १३व्या परिषदेत १० ऑक्टोंबर रोजी आरोग्यमंत्र्यांनी केंद्र व राज्यांचा मिळून माता व नवजात बालकांचा मृत्यू शून्यांवर आणण्यांसाठी ‘सुमन’ या उपक्रमाची सुरुवात केली. या अंतर्गत सर्व गरोदर माता, ६ महिन्यांपर्यंतच्या स्तनदा माता तसेच सर्व आजारी बालके यांचा समावेश करण्यात आला आहे. माता व बालकांना ९ प्रकारच्या गुणात्मक सेवा उपलब्ध करून देण्याची हमी या उपक्रमात शासनातर्फे देण्यात येणार आहे.
या रुग्णालयांत सुविधा
सुमन उपक्रमासाठी प्राथमिक स्तरावरील सुविधेसाठी शेंदुर्णी (ता. जामनेर), अडावद (ता. चोपडा) व कुर्हा (ता. मुक्ताईनगर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, दुसर्या स्तरावरील सुविधेसाठी जामनेर व मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय तर तिसर्या श्रेणीसाठी चाळीसगाव व पारोळा ग्रामीण रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे.