सिल्व्हर ओकवरील हल्ला : नांगरे पाटलांना निलंबित करा

0
6
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार  यांच्या मुंबई येथील ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला पूर्व नियोजित होता. गुप्तचर यंत्रणांनी या हल्ल्याची पूर्वसूचना दिली होती. ही माहिती कायदा व सुव्यवस्था बघणारे मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी लपविली. त्यांना निलंबित करून चौकशी करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर  यांनी अकोला  पत्रकार परिषदेत केली.

घटनेच्या चार दिवस आधी, एप्रिल २०२२ रोजी या हल्ल्याची शक्यता वर्तविणारा सविस्तर अहवाल गुप्तचर यंत्रणांकडून सहपोलिस आयुक्तांना देण्यात आला होता. या अहवालात मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’, आझाद मैदान मंत्रालय, सह्याद्री अतिथिगृह, परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकीय व वांद्रे येथील खासगी निवासस्थान या ठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलन करू शकतात, असे सांगितले होते. हा अहवाल सहपोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना पाठविण्यात आला होता. गुप्तचर विभागाचा अहवाल सकाळ, संध्याकाळ मुख्यमंत्र्यांना दिला जातो. त्यामुळे हल्ल्याच्या घटनेचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला किंवा नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असे आव्हान ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व आमदार यांच्या सतत खटके उडत आहेत. अशा पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणेचा स्पष्ट अहवाल सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना मिळाल्यानंतरही त्यांनी योग्य कार्यवाही का केली नाही, असा प्रश्न आंबेडकर यांनी विचारला व नांगरे पाटील यांना निलंबित करून चौकशी करण्याची मागणी केली. ज्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे, त्यांच्याकडेच या घटनेची चौकशी सोपविल्याने त्यांना तातडीने चौकशी समितीच्या प्रमुखपदावरून दूर करा, असे आंबेडकर म्हणालेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here