सावदा व रवंजे येथे 15 दिवसांत पाणी पुरवठा योजनांना मंजुरी : ना. गुलाबराव पाटील

0
37

जळगाव : प्रतिनिधी

आपण कोणताही पक्षीय भेद न बाळगता जिल्ह्यात आवश्‍यकतेनुसार पाणी पुरवठा योजनांना जलजीवन मिशनच्या अंतर्गत मंजुरी प्रदान केली आहे. बडेजाव मिरवण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष कामांना महत्व देतो. या अनुषंगाने एरंडोल तालुक्यातील सावदा आणि रवंजे येथील पाणी पुरवठा योजनांना 15 दिवसात मंजुरी देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. याबाबत त्यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता भोगवडे यांना निर्देश दिले. एरंडोल तालुक्यातील खर्ची येथील पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन आणि जिल्हा परिषद शाळेच्या वॉल कंपाऊंडच्या लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते.

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील 305 गावांचा पाणी प्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी 213 कोटींची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील कुणीही व्यक्ती तहानलेला राहू नये यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही ना. पाटील यांनी दिली.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते एरंडोल तालुक्यातील खर्ची येथील जलजीवन मिशनच्या अंतर्गत 31 लक्ष 16 हजार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन आणि जिल्हा परिषदेच्या 13 लक्ष निधीतुन बांधकाम करण्यात आलेल्या वॉल कंपाऊंडचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगवडे, पाणी पुरवठा योजना उपअभियंता रमेश वानखेडे, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा महानंदाताई पाटील, बाजार समिती माजी सभापती संभाजी चव्हाण, माजी जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी , किशोर निंबाळकर , रविंद्र जाधव रवंजे सरपंच गोकुळ देशमुख, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, माजी सभापती भिकाभाऊ कोळी, माजी जिल्हा बँक संचालक सरपंच रूक्मीणीताई मराठे, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष सचिन पवार, डॉ. सतीश देवकर, उपसरपंच ममताताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, जामाबाई शिरसाळ, रूक्मीणीबाई शिंदे, जयश्रीताई पाटील, चंद्रजीत पाटील, किशोर पाटील, जितेंद्र पाटील, भगवान शेळके, मंगल पाटील, रतनाबाई पाटील, सगुणाबाई शिंदे, मोहन कोळी, उत्तम माळी,देवीदास चौधरी सर, ग्रामसेविका संगीता पवार , विठ्ठल माळी, योगेश चव्हाण, रोहिदास कोळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे गावात आगमन होताच अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. तसेच याप्रसंगी खर्ची रवंजे ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी आणि माळी समाजाच्या वतीने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. तर जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याने येथील डॉ. नलीन महाजन यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जळगाव लोकसभा क्षेत्राचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक महानंदाताई पाटील, जि. प. सदस्य नाना महाजन, डॉ. नलीन महाजन आदींनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपण आधी खर्ची गावात भाजी विकण्यासाठी येत होतो. यानंतर आपले गावाशी कायमचे ऋणानुबंध जुडल्याचे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. हे गाव आधी देखील आपल्या सोबत होते आणि आजही असल्याचे सांगत त्यांनी आपल्या विकासाभिमुख वाटचालीची माहिती दिली. ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आधीच्या पाणी पुरवठा योजनांमधील सर्व त्रुटी दूर करून शासनाने जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येकाला घरपोच पाणी देण्याचे नियोजन केले आहे. याच्या अंतर्गत सन 2024 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या महत्वाकांक्षी योजनेत जिल्ह्यातील 818 गावांसाठी कृती आराखडा तयार करण्यात आलाा आहे. आधीच्या योजना या दरडोई 40 लीटर पाण्याच्या निकषावर आखण्यात आल्या होत्या. तर जलजीवन मिशन ही 55 लीटर दरडोई या निकषावर अंमलात आली आहे. आधी गुरांना लागणार्‌या पाण्याचा यात विचार करण्यात आला नव्हता. तर जल जीवन मिशनमध्ये याचा पूर्णपणे विचार करण्यात आला आहे. आधीची योजना ही पाणी टाकीपर्यंत पोहचवण्यासाठी अंमलात आल्या होत्या. तर जलजीवन मिशन मध्ये प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचे मिशन आखण्यात आले आहे. आधीच्या योजना जलसाठा करणार्‌या टाकीपर्यंत पाणी पोहचवण्यासाठी होत्या. आता जलजीवन मिशनमध्ये प्रत्येक घराला नळजोडणी मिळणार आहे.
ना. पाटील पुढे म्हणाले की, आपण पाणी पुरवठा योजना मंजूर करतांना राजकीय विचार करत नाही. कोणताही भेद न बाळगता जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांना गती देण्यात आली असून यात खर्ची गावच्या योजनेस आता प्रारंभ झालेला आहे. तर परिसरातील रवंजे आणि सावदे या दोन्ही गावातील पाणी पुरवठा योजनांना आगामी 15 दिवसात प्रशासकीय मान्यता देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. एवढेच नव्हे तर ही मान्यता प्रदान करण्याचे निर्देश त्यांनी पाणी पुरवठा अभियंता भोगवडे यांना दिले.
चिमणआबा भाग्यवान आमदार
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, एरंडोल तालुक्याचा समावेश असलेल्या मतदारसंघातून आपण दोन वेळेस आमदार म्हणून निवडून आलो. या तालुक्यात शिवसेनेची अगदी तळागाळापर्यंत बांधणी झालेली आहे. या मतदार संघातील कार्यकर्ते सक्रिय व पक्षनिष्ठ असून सोन्यासारखे आहेत. यामुळे चिमणराव पाटील यांना ही संघटनात्मक बांधणी लाभदायक ठरली असून ते याबाबत भाग्यवान आमदार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here