चोपडा : प्रतिनिधी
येथील अंकलेश्वर – बुरहाणपूर महामार्गावार असलेले अकुलखेडा गांवाकडे जातांना हॉटेल खेतेश्वर व हॉटेल संकेत जवळील अनधिकृत गतिरोधकांमुळे दुचाकीस्वारांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे सदर अनधिकृत गतिरोधक काढण्यात यावे याबाबत जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे व अकुलखेडा उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. सदर वृत्त सायंदैनिक साईमतने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत आज दि.27 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जेसीबी लावून ते अनधिकृत गतिरोधक काढण्यात आले.
अनधिकृत गतिरोधकांमुळे अकुलखेडा, काजीपूरा, हिंगोणे, चहार्डी, हातेड व गलंगी तसेच परिसरातील सर्व गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. सदर बातमीचे वृत्त दि.26 रोजी प्रकाशित झालेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, चोपडाचे कनिष्ठ अभियंता प्रमोद सुशीर यांच्याशी संपर्क साधला असता ते अनधिकृत गतिरोधक तात्काळ काढण्यात येतील असे त्यांनी सांगितले. व त्यानुसार आज दि.27 ला गतिरोधक जेसीबीद्वारे काढण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या या ठोस कारवाईचे सुजाण नागरिकांमार्फत प्रशंसा करण्यात येत आहे. मात्र भविष्यात परत कधी असे अनधिकृत गतिरोधक बनवून सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होवू नये याकडे सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागानी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.