नाशिक : प्रतिनिधी
काही दिवसांसाठी जनशताब्दी आणि गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. इगतपुरी येथील टिटोली यार्डातील तांत्रिक कामांमुळे मध्य रेल्वेने आज शनिवारपासून सहा दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे . मेगा ब्लॉकमुळे गोदावरी एक्सप्रेस व मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या विलंबाने धावणार असल्यामुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.
येथील मध्य रेल्वेच्या टिटोली यार्डात रेल्वे प्रशासनातर्फे २८ मे ते १ जून या दरम्यान तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहेत . या कामांमुळे मनमाड – मुंबई – मनमाड गोदावरी स्पेशल रेल्वे. २८ मे ते २जूनदरम्यान दोन्ही बाजूंनी धावणार नाही . त्याचप्रमाणे मुंबई – जालना जनशताब्दी एक्स्प्रेस ३० आणि ३१ तारखेला सुरु होणाऱ्या स्थानकापासूनच पूर्णपणे रद्द होईल . तसेच परतीची जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस दि . ३१ मे आणि १ जून रोजी सुरु होणाऱ्या स्टेशनपासून पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
भुसावळ ते इगतपुरी स्टेशनदरम्यान धावणारी ” मेमू ” इगतपुरीपर्यंत न येता नाशिकरोड स्टेशनपर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. त्यामुळे चार – पाच दिवस चाकरमाने , विद्यार्थी आणि अन्य प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात नाशिकरोड रेल्वे स्थानकातून मुंबईला जाणाऱ्या मेल , एक्स्प्रेस नियंत्रित करून चालविण्यात येणार असल्याने त्या एक ते दोन तास उशिराने धावतील.
तसेच, मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल व एक्स्प्रेसनाशिकरोडपर्यंत एक ते दोन तास उशिराने धावण्याची शक्यता असून , नाशिकरोडनंतर सुरळीत जातील. मेगाब्लॉकच्या काळात १५२ एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होणार असल्याने याचा फटका प्रवासी व चाकरमान्यांना बसणार आहे.