नवी दिल्ली, वृत्तसंस्था । देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती सातत्यानं वाढत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्यानं नवनवे विक्रमही होत आहे. इंधन कंपन्यांनी शनिवारी २३ ऑक्टोबर रोजी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी ३५ पैशांची वाढ करण्यात आली असून यानंतर देशभरात पेट्रोल डिझेलचे दर विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर (Crude Oil) ९० डॉलर्स प्रति बॅरल पर्यंत पोहोचू शकतात, असं जाणकारांचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत भारतीय बाजारपेठेत पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीपासून दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाही.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं (IOCL) दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत पेट्रोलचे दर विक्रमी १०७.२४ रूपये प्रति लिटर आणि मुंबईत ११३.२ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आता डिझेलचे दर १०४ रूपये प्रति लिटर इतके झाले आहे. तर दिल्लमी मध्ये डिझेलची किंमत ९५.९७ रूपये इतकी झाली आहे.
मध्य प्रदेशातील अखेरचा जिल्हा बालाघाट, जो छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे, त्या ठिकाणी पेट्रोलच्या दरानं विक्रमी स्तर गाठला आहे. बालाघाटमध्ये पेट्रोलचे दर ११८.२५ रूपये प्रति लिटर झाले आहेत. तर डिझेलचे दर १०७ रूपये प्रति लिटर झाले आहेत.
ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल डिझेलच्या दरात विक्रमी वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याचा हा सलग चौथा दिवस आहे. १८ आणि १९ ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. परंतु त्यापूर्वी सलग चार दिवस दरात ३५ पैशांची वाढ झाली होती.
बहुतांश प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या दरानं यापूर्वी १०० रूपये प्रति लिटरचा स्तर गाठला होता. त्यानंतर बहुतांश ठिकाणी डिझेलच्या दरानंही १०० रूपयांचा स्तर गाठला आहे.
तुम्ही एसएमएसद्वारेही आपल्या ठिकाणचे पेट्रोलचे दर जाणून घेऊ शकता. यासाठी RSP कोड टाईप करून तो 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.