जळगाव :प्रतिनिधी
येथील लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित सरदार वल्लभभाई पटेल चषक पर्व तिसरे आयोजित “लेवा पाटीदार प्रीमियम लीग” स्पर्धेचे विजेतेपद सिध्दीविनायक सुपर रायडर्स संघाने पटकावले. द्वितीय विजेतेपद शिवम सुपर किंगने जिंकले. रविवारी २७ फेब्रुवारी रोजी रात्री मान्यवरांच्या हस्ते चमचमती ट्रॉफी देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले.
रविवारी उपांत्य फेरीचे सामने झाले. या सामन्यात शिवम सुपर किंगने त्रिमूर्ती ब्लास्टर्स संघाचा तर सिध्दीविनायक सुपर रायडर्स संघाने रिअल्टी रोव्हर्स संघाचा दणदणीत पराभव करीत दिमाखाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुपारी तिसऱ्या क्रमांकासाठी त्रिमूर्ती आणि रिअल्टी संघात सामना झाला. यामध्ये त्रिमूर्ती संघाने रिअल्टी रोव्हर्स संघाचा पराभव करून तिसरे स्थान राखले. संध्याकाळी ७ वाजता अंतीम सामना सुरु करण्यात आला. सिध्दीविनायक संघाने नाणेफेक जिंकून शिवम सुपर किंग संघाला प्रथम फलंदाजी दिली. गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत दहा षटकात शिवम संघाला केवळ ७० धावात रोखले. प्रत्युत्तरात सिध्दीविनायक संघाने फटकेबाजी करून हा सामना जिंकला. यानंतर पारितोषिक वितरण सोहळा घेण्यात आला. स्पर्धेसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे, आ.राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर तथा सभागृह नेते ललित कोल्हे, स्पर्धेचे ब्रँड अँबेसेडर उद्योजक डॉ. के. सी. पाटील, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, उद्योजक सुनील सरोदे, सुवर्ण उद्योजक भागवत भंगाळे, नगरसेविका सिंधुताई कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते ललित चौधरी यांच्यासह सर्व ३० संघांचे संघ मालक मंचावर उपस्थित होते. यावेळी विविध विजेत्यांना गौरविण्यात आले. यात स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेला उद्योजक चंदन अत्तरदे यांच्या मालकीचा सिध्दीविनायक सुपर रायडर्स संघासह द्वितीय क्रमांक डॉ. पंकज पाटील यांचा शिवम सुपर किंग, तृतीय ठरलेला त्रिमूर्ती ब्लास्टर्स, चतुर्थ ठरलेला अभिजित महाजन, ऍड. पुष्कर नेहेते यांचा रिअल्टी रोव्हर्स संघाला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
यासह एका डावात सर्वाधिक धावा विनय खडके (२९ चेंडूत १०२), सर्वोत्तम यष्टीरक्षक प्रतीक होले, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक फिल्डर बापू बरहाटे, फेअर प्ले अवॉर्ड विजेता संघ पल्स इलेव्हन, उत्कृष्ट गोलंदाज लोकेश सरोदे, सर्वोत्तम फलंदाज विनय कुरकुरे, मॅन ऑफ द सिरीज व उत्कृष्ट झेल लीलाधर खडके यांचाही ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच लीड्सकेम लीडर्स कडून दिला जाणारा मालिकावीर पुरस्कार धीरज कोलते याला देण्यात आला. स्पर्धेचा आढावा घेऊन संघमालक व प्रायोजकांचे आभार चंदन कोल्हे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बंटी भारंबे, पियुष कोल्हे, भूषण बढे, शक्ती महाजन, प्रवीण चौधरी, अमोल धांडे, हितेंद्र धांडे, महेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले.