जळगाव ः प्रतिनिधी
राज्य शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समर्पित आयोगामार्फत होणारे चुकीचे कामकाज तत्काळ थांबविण्यात यावे, अन्यथा अ.भा.महात्मा फुले समता परिषदेच्यातवतीने राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समता परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे देण्यात आला आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना यासंदर्भात निवेदन देवून या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. निवेदन देतांना समता परिषदेचे कार्याध्यक्ष वसंत पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, हेमरत्न काळुंखे, नितीन महाजन, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, समर्पित आयोगाने सर्वांच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इंम्पेरिकल डाटा दारोदारी जावून खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता. सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार सदोष पध्दतीने माहिती संकलित केली जात आहे. ही समस्त ओबीसी समाजाची फसवणूक होत आहे. यामुळे समाजाचे भविष्यात कधीही भरुन न येणारे नुकसान होणार आहे. त्यामुळे हे चुकीचे काम तत्काळ थांबविण्यात यावे, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर यांच्यामार्फेत योग्य ती माहिती संकलित करून ती शासनामार्फेत सर्वाच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.