जळगाव ः प्रतिनिधी
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या 80 व्या जन्मोत्सवानिमित्ताने सनातन संस्थेतर्फे गुरुवारी सायंकाळी शहरातून हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. यावेळी श्रीरामचंद्र की जय, जय भवानी जय शिवाजी यांसह घोषणांनी परिसर दणाणला होता.
सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. श्री श्री 1008 सरजू दास महाराज यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करत नेहरू चौक येथून दिंडीला सुरवात झाली. पौरोहित्य नंदू शुक्ल यांनी केले. टॉवर चौक, चित्रा चौक या मार्गे शिवतीर्थ मैदान येथील चौकात समारोप झाला. शेवटी उपस्थितांना सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, वरसाडेकर महाराज यांनी संबोधित केले.
शोभायात्रेच्या मार्गात नेहरू चौकात सुनिल कोल्हे, सपनकुमार झुणझुणवाला, टॉवर चौकात निलेश पवार, चित्रा चौकात निलेश संघवी व समस्त तांबट परिवार, इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळ नरेश वाणी, कोर्ट चौक येथे चैतन्य बापू संप्रदाय परिवारातर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली.
विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
टॉवर चौक, चित्रा चौक, कोर्ट चौक येथे हिंदु जनजागृती समितीतर्फे स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विवेकानंद प्रतिष्ठानतफ;ा दांडपट्टा, लाठी यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या वेळी इस्कॉन, योग वेदांत समिती, जय गुरुदेव, चैतन्य संप्रदाय, वारकरी संप्रदाय, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान, हिंदू राष्ट्र सेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान, हिंदु जनजागृती समिती या संघटना सहभागी झाल्या होत्या.