‘संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती’ ग्रंथाचा 23 रोजी नाथषष्ठीला प्रकाशन सोहळा

0
17

भुसावळ : प्रतिनिधी
संत एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगातून केलेली भक्ती आणि भारूडातून केलेले समाजप्रबोधन यावर पीएच.डी. पदवी मिळवल्यानंतर डॉ. जगदीश पाटील आपल्या प्रबंधाला ग्रंथरूप देत आहेत. श्री एकनाथ षष्ठीचे औचित्य साधून ‘संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
भुसावळ येथील रहिवासी तथा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणेचे मराठी भाषा अभ्यास गट सदस्य डॉ. जगदीश पाटील यांना 2012 मध्ये ‘संत एकनाथ अभंगगाथा : भक्ती विचार’ या विषयावर प्रा.डॉ.सौ. आशालता महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावतर्फे पीएच.डी. ही पदवी प्रदान करण्यात आली होती. या प्रबंधाचे ग्रंथरूप व्हावे या उद्देशाने श्री संत एकनाथ महाराजांचा जलसमाधी दिन श्री एकनाथ षष्ठीचे औचित्य साधून ‘संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती’ हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या ग्रंथाला प्रा.डॉ.सौ. आशालता महाजन यांची प्रस्तावना तर प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर नांदेड यांचा अभिप्राय लाभला आहे. प्रकाशकांची भूमिका हभप लक्ष्मण महाराज चिखलीकर यांनी स्वीकारली आहे. ग्रंथाचा प्रकाशन सोहळा बुधवार, दि. 23 मार्च 2022 रोजी दुपारी 4 वाजता फैजपूर येथील सतपंथ मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होणार असून अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सौ. आशालता महाजन राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून श्री संत एकनाथ महाराज यांचे चौदावे वंशज हभप योगिराज महाराज गोसावी आणि नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथातून नवविधाभक्तीचे दर्शन – श्री संत एकनाथांच्या अभंगात असलेल्या नवविधाभक्तीचे दर्शन वाचकांना या ग्रंथाच्या माध्यमातून होऊ शकेल. त्यासाठी या ग्रंथाचे तीन विभाग करण्यात आले आहे. पहिल्या विभागात अंतरीचे व संत एकनाथ महाराज जीवन चरित्र रेखाटण्यात आले आहे. दुसर्‍या विभागात संत एकनाथांनी आपल्या अभंगातून श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन या नऊ मार्गांनी केलेली भक्ती विविध संदर्भ देऊन सोदाहरण स्पष्ट करण्यात आली आहे. मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेऊ इच्छिणाऱ्या, संत साहित्याची गोडी असणाऱ्या व संत साहित्य अभ्यासणाऱ्या वाचकांसाठी हा ग्रंथ निश्चितच लाभदायी ठरणार असल्याचे डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here