संजय राऊतांचा भाजपला इशारा तपास यंत्रणा फक्त केंद्राच्याच नाही तर महाराष्ट्राच्याही आहेत.

0
20

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेत चांगलाच वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता पुढचा अंक सुरू झाला असून संजय राऊत यांनी आज थेट पंतप्रधान कार्यालय गाठून गैरव्यवहारांचे पुरावे सादर केले. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केले. केंद्र सरकारकडून कारवाईची आम्हाला कुठलीही अपेक्षा नाही. ज्याप्रमाणे केंद्रातील तपास यंत्रणा महाराष्ट्रात कारवाया करत आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील तपास यंत्रणा काम करतील, असा सूचक इशारा त्यांनी भाजप नेत्यांना दिला.

ते म्हणाले, केंद्र सरकारच्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सूडबुद्धीने कारवाया सुरू आहेत. खासकरुन महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या कारवाया सुरू आहेत. त्यातही महाराष्ट्रातील चित्र थोडे वेगळे आहे. जणूकाही केंद्रीय तपास यंत्रणांना संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रातच काम करायचे आहे. जणू काही महाराष्ट्रातच सर्वकाही घडत आहे. महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करायचे. खोटी प्रकरण, खोटे पुरावे पुढे करायचे. अशी चिखलफेक सुरू आहे. पण जे चिखल फेकत आहेत, त्यांचे हात देखील किती बरबटलेले आहेत याची माहिती देशाला सुद्धा कळायला हवी, असेही ते म्हणाले.

आज पंतप्रधान कार्यालयात मी काही पुरावे सादर केले आहेत. हा एक रेकॉर्ड आहे, आम्ही तुम्हाला कळवल्याचा. पण तुम्ही काहीच काम करत नाही. मुंबई महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणा यावर काम करतीलच. पण केंद्रातल्या यंत्रणा काय करत आहेत, हे देखील यानिमित्तानं कळेल, असं सांगतानाच तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाहीत. त्या महाराष्ट्रातही आहेत, असा सूचक इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिला.

भाजपामधल्या दोन-चार लोकांना हाताशी धरून कशा पद्धतीने वेगळं क्रिमिनल सिंडिकेट चालवत आहेत, त्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाला पोहोचवणं हे शिवसेनेचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे. त्याबाबत माहिती मी वेळोवेळी पंतप्रधान कार्यालयाला देत जाईन. यानंतर मुंबईत येऊन याबाबत पत्रकार परिषद घेईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

यावेळी त्यांनी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणावरही भाष्य केले. आमच्या सगळ्यांचे फोन टॅप केले. त्यातून त्यांना काय साध्य करायचं होतं. हे हळूहळू तपासातून निष्पन्न होत जाईल, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here