राज्य नाट्य स्पर्धा जसजशींतिम टप्प्याकडे झुकु लागली आहे तसतशी स्पर्धेची उंची वाढत असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे.काल इंदौर येथील नाट्यसंपदा संस्थेने सादर केलेले डहुळ या नाटकाने एक विशिष्ट उंची गाठल्याने रसिकांनाही ते भावले. नाटकाचे खरं सादरीकरण किती सुटसुटीत व रेखीव असावं व ते सर्व बाजूंनी कसं परिपूर्ण असावं याचा सुखद प्रत्यय आणून दिला.विशेष म्हणजे प्रमुख भूमिका, दिग्दर्शक व नाट्य रूपांतरण या तिन्ही आघाड्यांवर श्रीराम जोग यशस्वी ठरले असे म्हटल्यास अतिशोयक्ती ठरु नये.
जुन्या पिढीतील महान साहित्यिक व आजच्या पिढीतील उदयास येणारा साहित्यिक यांच्या मनातील वैचारिक व्दंद सादर करतांना ‘डेहुळ’ ने ‘महान’ होण्याच्या धडपडीत आपण आपले स्वतःचे अस्तित्व कसे गमावून बसतो हे मोठ्या खुबीने सादर केले आहे.
नाट्य रूपांतरण करण्याची किमया लेखकद्वय श्रीराम जोग आणि सतीश पाठक यांनी सहजगत्या पेलली आहे.
कसदार अभिनय व प्रभावी सादरीकरण
वसूची भूमिका करणारे श्रीराम जोग यांनी महानपणा व त्यामुळे त्यांची होणारी घुसमट प्रभावीपणे सादर केली असून त्यांच्या कसलेल्या अभिनयाला प्रेक्षकांनी जागोजागी टाळ्यांची दिलेली साथ बोलकी ठरली.“माझ्या मागे येऊ नको’ असा मोलाचा सल्ला रत्नाकरला नदीकिनारी देतांना नाटकाची तांत्रिक बाजूही दिग्दर्शक म्हणून श्रीराम जोग यांनी तेवढ्याच समर्थपणे सांभाळली. रत्नाकरची भूमिका लोकेश निमगावकर यांनी व्यवस्थितपणे साकारली आहे.याशिवाय दिलीप लोकरे(वसुचं मन),प्रतिक्षा बेलसरे(वसुची प्रसिध्दी), अनंत मुंगी(रत्नाकरांचं मन) व श्रुतिका जोग-कळमकर(रत्नाकरांची प्रसिध्दी)यांनी आपआपल्या वाट्याला आलेल्या भूमिका तितक्याच ताकदीनिशी निभावल्या आहेत.
कथेचा गाभा
साहित्य सृष्टितील दोन व्यक्ती एक प्रतिष्ठीत, सुप्रसिध्द, महानपणाला पोहचलेले वयोवृध्द साहित्यकार ‘वसु’ तर दुसरे चाळीशीतळे नव्या पीढीच प्रतिनिधीत्व करणारे, प्रसिध्दीच्या झोकात हळूहळू पण ठामपणे आपली उपस्थिती दर्ज करविणारे उमीदेचे साहित्यकार ‘रत्नाकर’ एका पुस्तक विमोचन कार्यक्रमाच्या अनुषंगाने ‘रत्नाकर’ यांची भेट होते ती वसुच्याच गावात वसुंशी सकाळची भेट घेवून निघणारे रत्नाकर वसुंच्या प्रसिध्दीने संभ्रमित होतात, भारवतात आणि पूर्ण दिवस त्यांच्या बरोबर काढतात.
रात्रीचं जेवणं झाल्यानंतर दोघेही आपापल्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणारे साहित्यकार रात्रीच्या वेळी गावातल्या नदीकाठी येऊन बसतात. आणि इथून सुरु होतं एक चिंतन नाट्यातून मन आणि प्रसिध्दीच्या कचाट्यात सापडलेल्या माणसाची डहुळेलेली स्थिती व्यक्त करणारे नाटक ‘डहुळ’
तांत्रिक बाजूही दमदार
‘डेहुळ’ च्या तांत्रिक बाजूही तितक्याच अचूक ठरल्याने नाटकाचा प्रभाव आणखी पडला. अनिरुद्ध किरकिरे, जय हार्डीया या दोघांची नेपथ्यातील कामगिरी दमदार ठरली असून त्यांना श्रीरंग डिडोळकर,स्वानंद डिडोळकर,प्रांजली सरवटे ,रजत मुजुमदार व श्रेयस खंडारे यांचे सहकार्य लाभले.ध्वनी संयोजक शशिकांत किरकिरे यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी चोखपणे बजावली.अभिजीत कळमकर यांची प्रकाशयोजना नाटकाच्या प्रसंगांना उठावदार करणारी,विशेषतः नदीकाठावरील प्रसंग लक्षवेधक ठरले. दीपाली दाते यांची वेशभूषा व श्रुतिका जोग-कळमकर यांची रंगभूषाही चांगली. निर्मिती सहाय्यक विजय सुपेकर,मेघना निरखीवाले यांची कामगिरी अचूक.एकंदरीत एक परिपूर्ण व सर्वांगसुंदर नाट्यकृतीची अनुभूती …डेहुळ… ने दिली एवढे निश्चित.त्याच बरोबर नाट्यस्पर्धेतील चुरस आता शिगेला पोहचली असून स्पर्धेतील उर्वरित नाट्यसंस्थेसमोर आव्हान उभे ठाकले आहे.