साईमत, शहादा । प्रतिनिधी
तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखाना नागाई शुगर्स या कंपनीने चालवायला घेतला आहे. या साखर कारखान्यात दिलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना अजून मिळालेले नाही. शेतकऱ्यांच्या पैश्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
शहादा तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखाना परिसरातील जवळपास १३०० शेतकऱ्यांनी या कारखान्याला आपला ऊस दिला असून गेल्या सात महिन्यापासून कारखान्याने शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट दिलेले नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यासोबत कारखान्यावर ऊसतोड करणाऱ्या कामगारांचे ही पैसे मिळाले नसल्याने शहादा तहसील कार्यालयात नर्मदा बचाव आंदोलनाच्या ज्येष्ठ नेत्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ऊसतोड कामगारांनी आंदोलन करत प्रशासन आणि कारखाना संचालकांची भेट घेतली. प्रांताधिकारी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत कारखान्याच्यावतीने २० ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्र शासनाच्या मूलभूत किमतीनुसार ऊसाला भाव देण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या राहिलेल्या पैशावर १५ टक्केप्रमाणे व्याजही देण्याची मागणी केली आहे.