गुवाहाटी: ठाकरे सरकारविरोधात एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसोबत बंड पुकारल्यानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे सुरुवातीला सूरत आणि नंतर थेट गुवाहाटीत दाखल झाल्याने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी संवाद साधने कठीण झाले आहे. यात शिंदेंना आर्त हाक देण्यासाठी साताऱ्यातील काही शिवसैनिक गुवाहाटीत जाऊन पोहोचले. या शिवसैनिकांपैकी संजय भोसले यांनी हॉटेल रॅडिसनबाहेर जोरदार घोषणबाजी केली. यावेळी आसाम पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.आता भोसले यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भोसले यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत परतरण्याचे आवाहन केले.शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत यावे,असे आवाहन त्यांनी केले आहे. शिंदे यांनी शिवसेनेत यावे, हे सांगायला मी इकडे आलो आहे. केंद्र सरकारने त्यांच्यावर दबाव आणला आहे. मात्र त्यांनी शिवसेनेची साथ सोडू नये. मी बाळासाहेबांचा आणि उद्धवसाहेबांचा निष्ठावान शिवसैनिक आहे, असे संजय भोसले म्हणाले. संजय भोसले हे शिवसेनेचे सातारा उपजिल्हा प्रमुख आहेत. त्यांच्यासोबत गुवाहाटीत अनेक कार्यकर्तेही आहेत. इतकेच नाही तर शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते शिंदे यांना शिवसेनेत परतण्याचे आवाहन करण्यासाठी गुवाहाटीमध्ये जातील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा मुक्काम असलेल्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही राडा केला. यावेळी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी शिंदे आणि त्यांच्यासोबत असेलल्या आमदारांविरोधात घोषणाबाजी केली आहे. यादरम्यान तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी रॅडिसन हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला.
भाजपने महाराष्ट्रातील राजकारण आसाममध्ये खेळू नये. आसामच्या अनेक भागांमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अद्यापही केंद्र या पूरग्रस्तांना मदत केली नाही, त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिंदे आणि भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.