शिवसेनेला अजून एक मोठा धक्का!

0
67

मुंबई : प्रतिनिधी 

मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसैनिकांनी बंडखोर नेत्यांच्या कार्यालयावर हल्ले केले. त्यांचा निषेध केला. याला शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल शक्तिप्रदर्शन करून शिवसेनेचा निषेध केला. त्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला; शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी, शिंदेंच्या समर्थनात राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. मागील अडीच वर्षांपासून आपल्या संघटनेची राष्ट्रवादी पक्षाकडून गळचेपी चालली आहे. त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असे म्हस्के यांनी आपल्या ट्विट केले.

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेना पक्षातील हा पहिलाच राजीनामा आहे. नरेश म्हस्के यांचा राजीनामा शिवसेनेसाठी पहिला मोठा धक्का आहे. ही घोषणा म्हस्के यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे “भगवे आमचे रक्त तळपते,तप्त हिंदवी बाणा.. जात,गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना , शिवसेना ,शिवसेना…! शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच. पण गेली अडीच वर्षे आपल्या संघटनेची “राष्ट्रवादी” गळचेपी चालली आहे. त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र.”

दरम्यान, शिंदे यांच्या बंडखोरीचे राज्यात अनेक ठिकाणी समर्थन केले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी एक संदेश जारी केला असून माझा लढा शिवसेनेला महाविकास आघाडीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी आहे, असे म्हटले आहे. ”प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या. महाविकास आघाडीचा खेळ ओळखा. महाविकास आघाडीच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिताकरीता समर्पित आहे.” असे शिंदे यांनी संदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here