मुंबई : प्रतिनिधी
काल विधानपरिषद निवडणुकीचा निकाल (Legislative Council election results) लागल्यानंतर शिवसेनेत मोठा भूकंप आला आहे. अचानक शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते आणि मंत्री एकनाथ शिंदेंनीच बंड पुकारल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे आता सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष आमदारही बिथरल्याचे दिसत आहेत.
शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी काही अपक्ष आमदारांनी आपला पाठिंबा दिला होता. यामध्ये मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन(Geeta Jain) यांचा देखील सहभाग आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी बंडाळीची भूमिका घेतल्यानंतर जैन यांनी फेसबुक पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अनेक पत्रकारांनी तसेच कार्यकर्त्यांनी संपर्क साधला असून भूमिकेबद्दल विचारणा केली. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की पुढील वाटचालीबद्दल जो काही निर्णय असेल तो सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य वेळी घेण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये मध्यरात्री पोहोचलेल्या आमदारांमध्ये रमेश बोरणारे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत, संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल हे आहेत. या आमदारांना शिंदे यांनी मोठया प्रमाणात विकासनिधी दिला आहे. दुसरीकडे राजन विचारे, रवींद्र फाटक हे ठाण्यातच आहेत. प्रताप सरनाईक यांचा फोन मात्र नॉट रिचेबल येत आहे.



