मुंबई: प्रतिनिधी
युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारलेली असतानाच आता आणखी एका शिवसैनिकाच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि शिवसैनिक संजय कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारली आहे. सकाळपासूनच कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाडसत्रं सुरू केलं आहे. तसेच पुण्यातील आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही आयटीने छापा मारल्याची सूत्राची माहिती आहे. आयकर विभागाने एकाच दिवशी दोन शिवसेना नेत्यांच्या घरांवर छापेमारी केल्याने शिवसेनेचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तर, आयकर विभागाच्या धाडीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रीय यंत्रणा भाजपच्या प्रचार यंत्रणा, महाराष्ट्र झुकणार नाही, थांबणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
स्थानिक शिवसैनिक संजय कदम यांच्या घरावर आज सकाळी आयकर विभागाने छापेमारी सुरू केली. अंधेरीच्या कैलास नगरमधील स्वान लेक कैलास या इमारतीतील 16 व्या मजल्यावर संजय कदम राहतात. कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय असून केबल व्यावसायिक आहेत. त्यांच्या अंधेरीच्या घरी आयकर विभागाचे एक पथक आले असून त्यांनी छापेमारी सुरू केली आहे. त्यांच्या इमारतीच्या खाली केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तर, दुसरीकडे पुण्यातही आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरी आयकर विभागाने छापे मारल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, आज सकाळी आयकर विभागाने शिर्डी देवस्थानचे ट्स्टी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला. आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी आले आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली आहे. यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे.