शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेत जातील; उमेदवारी अर्ज केल्यानंतर राऊतांचा दावा

0
50

मुंबई :- प्रतिनिधी 

आज शिवसेनेकडून राज्यसभेच्या २ जागांसाठी माजी खासदार संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणुकीबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. तसेच, यावेळी भाजपाकडून दबावतंत्र सुरू असल्याचे म्हणत शिवसेना आणि महाविकास आघाडी दबावाला भीक घालत नसल्याचे ठणकावून सांगितले.

 

राज्यसभेच्या निवडणुकीत माजी खासदार संभाजीराजे यांनी सहाव्या जागेसाठी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस बघायला मिळू शकते. त्यातच दोन उमेदवार आरामात राज्यसभेवर निवडून जाण्याची खात्री असताना भाजपानं तिसरा उमेदवार देखील उभा करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध न होता लढवली जाईल, असे चित्र दिसत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही वेळेपूर्वीच स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आज संजय राऊतांनी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेवर जातील यात कोणतीही शंका नसल्याचे मोठ्या विश्वासाने म्हटले आहे. शिवसेनेकडून मी स्वत: आणि कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, आमचे सगळे मंत्री, आमदार, एकनाथ सिंदे, संदीपान भुमरे, खासदार, संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते यावेळी उपस्थित होते. मी दाव्यानिशी सांगू शकतो की यावेळी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील. आमच्या मनात कोणतीही शंका नाही. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल ३१ तारखेला अर्जदाखल करणार आहेत. काँग्रेसचा उमेदवार ठरल्यावर ते दाखल करतील. पण महाविकास आघाडी एकत्र आहे. सहा जागांपैकी आमच्या चार जागा आम्ही निवडून आणू, अशी माहिती त्यांनी दिली.

भाजपने सहाव्या जागेसाठी तिसरा, चौथा, पाचवा उमेदवार द्यावा. आम्ही आमच्या जागा सहज निवडून आणू. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून आमच्यावर दबाव टाकून त्यांच्या जागा जिंकून येणाऱ्या असतील, तर त्यांनी प्रयत्न सुरू ठेवावे. आमची काही अडचण नाही. देशात लोकशाही आहे. आमच्या जागा लढण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. शिवसेना अशा दबावाला भीक घालत नाही, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

या सर्व कारवाया फक्त राजकीय सूडबुद्धीनं आणि बदल्याच्या भावनेनं सुरू आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला काय चाललंय हे माहिती आहे. हा काळही निघून जाईल आणि एक दिवस ही सूत्र आमच्या हातात असतील, असे राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here