मुंबई : प्रतिनिधी
एकीकडे राज्यात राज्यसभा निवडणुकीवरून वातावरण तापलेलं असतानाच आता विधानपरिषद निवडणुकांसाठी देखील हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. लवकरच शिवसेनेकडून या दोन नावांची अधिकृत घोषणा होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.त्यात मुंबईचे सचिन अहिर यांचा समावेश असल्याचे विश्वसनीय गोटातील वृत्त आहे.
सचिन अहिर यांचे पुनर्वसन?
2019च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले आणि आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवर पाणी सोडणारे सचिन अहिर यांचे नाव शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या माध्यमातून सचिन अहिर यांचे शिवसेनेकडून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा देखील अंदाज बांधला जात आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवलेलं असताना विधानपरिषद निवडणुकीसाठी देखील उमेदवार निवड निश्चित करण्यात आल्याचं बोलले जात
आहे.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराला राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याच्या बदल्यात विधानपरिषदेची एक जागा भाजपासाठी सोडण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून देण्यात आला होता. मात्र, ही चर्चा अपयशी ठरल्यानंतर राज्यसभा निवडणुका होणार असल्याचे निश्चित झाले. त्यापाठोपाठ विधानपरिषद निवडणुकांसाठी आता शिवसेनेकडून नावे निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.