नंदुरबार (प्रतिनिधी) येथील बालवीर चौक नवा भोईवाडा परिसरातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त मंगलाष्टके होण्यापूर्वी हळदीच्या अंगाने वधूवरांच्या हस्ते शिव पूजन करण्यात आले.
नंदुरबार येथील गवळीवाडा भागातील संतोष देमाजी घुगरे यांची सुकन्या चि. सौं. का. भाग्यश्री आणि धुळे मोगलाई येथील राजेंद्र बिडकर यांचे चिरंजीव विवेक यांचा विवाह दिनांक 19 रोजी होता. उपवर वधु वरांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी आणि अक्षदा पडण्यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शिवपुजन केले. शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या संकल्पनेतून वधू-वरांच्या हस्ते शिव पूजन करण्यात आले. याप्रसंगी बालवीर चौकात शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा आणि भगवे ध्वज यांनी परिसर सजविण्यात आला होता. ध्वनिक्षेपककावर छत्रपती शिवरायांचे पोवाडे आणि गीताने चैतन्य निर्माण झाले होते. शिवपूजन कार्यक्रमास मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार सेवानिवृत्त शिक्षक जी. एस. गवळी, संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, धुळे येथील संदीप बिडकर, गणेश बिडकर, बोरविहीर येथील कीटकनाशक प्रतिनिधी राजेन्द्र बिडकर, प्रा. एकनाथ हिरणवाळे,ईश्वर घुगरे, साई घुगरे, डॉ.भूषण पालकडे, प्रफुल्ल राजपूत, यांच्यासह गवळी समाजातील महिला शालेय विद्यार्थी उपस्थित होते.