शिरसाळा(मारुती) येथे पोलिस चौकी उभारा -अ‍ॅड. रवींद्रभैय्या पाटील

0
75

बोदवड : प्रतिनिधी ( सुहास बारी )
तालुक्यातील शिरसाळा येथे दर शनिवारी हजारोंच्या संख्येने भाविक मारुतीरायाच्या दर्शनासाठी येतात. प्रचंड प्रमाणात होणाऱ्या या गर्दीमुळे अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असतो. यासाठी खबरदारी म्हणून या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्रभैय्या पाटील यांनी केली आहे.
शहराच्या उत्तरेस मुक्ताईनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर बोदवड शहरापासून बारा किमी अंतरावर प्रसिद्ध शिरसाळा मारुती मंदिर हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यामुळे या स्थळाला तीर्थ क्षेत्राचा दर्जा देत या ठिकाणचा विकास करावा, अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबीत आहे.त्यातच अलीकडे या तीर्थक्षेत्रावर दर शनिवारी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने रहदारीच्या समस्या निर्माण होतांना दिसत आहेत. म्हणून या ठिकाणी पोलीस बांधवांची उपस्थित अत्यावश्यक झाली आहे. हनुमान संस्थानच्या शिरसाळा येथील भक्तांचा प्रचंड वाढलेला प्रतिसाद पाहता शिरसाळा येथे पोलीस चौकी व्हावी अशी मागणी सातत्याने वाढत आहे, त्याकरता राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले,त्यानंतर पाटील यांनी मागणी केली आहे. निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील व त्यांचे संचालक मंडळ व सरपंच प्रवीण पाटील, बोदवड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक भरत अप्पा पाटील यांची स्वाक्षरी आहे. लवकरात लवकर पोलिस चौकीची मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. बोदवड तालुक्यातील शिरसाळा गावाबाहेर नदीकाठी एका निंबाच्या झाडाखाली असलेल्या या मारुतीमंदिराची आज शिरसाळा गावाची ओळख बनली आहे.
याबाबत अख्यायिका अशी की, पुरातन काळात गावात असलेल्या एका व्यक्तीच्या स्वप्नात मारुतीने दृष्टांत दिला. त्यानुसार गावाबाहेर असलेल्या नदीतून मारुतीची पाषाण मूर्ती गावकऱ्यांनी गावात आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु सदर मूर्ती बारा गाड्या लावूनही हालत नसल्याने मामा -भाच्याकडून अलगद मूर्ती उचलली गेली. यानंतर निंबाच्या झाडाखाली ती बसवली. तेव्हापासून आज पर्यंत हा मारुतीराया उन, पाऊस व वारा झेलत असाच उभा आहे. अनेकांचा मनोकामना पूर्ण करीत आहे.
दरम्यान, भुसावळ तालुक्यातील द्वारकादास अग्रवाल या भाविकांची मनोकामना पूर्ण झाल्याने त्याने मंदिर बांधण्याचा संकल्प केला व मंदिर उभारले जात असताना कळसाचे काम सुरु केले, तेव्हाच ते आजारी पडले व कळस चढण्या आधीच पडून जात होता. शेवटी त्यांनी कळस बांधणे सोडून दिले, व त्यांची प्रकृती ही सुधारली तेव्हा पासून आज पर्यंत मंदिरावर कळस नसल्याचा इतिहास व आख्यायिका आहे.अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या या स्थळास तीर्थस्थानाचा दर्जा मिळावा व यातून पर्यटन विकास करावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here