‘ शिंदे गटात सामील होण्यासाठी ५० कोटींची ऑफर’

0
62

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसोबत बंडाचा पवित्रा घेतल्यानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे. यातच शिवसेनेच्या एका आमदाराने केलेल्या दाव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे गटात सामील होण्यासाठी आपल्याला ५० कोटींची ऑफर दिल्याचा दावा शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. एवढचं नव्हे तर दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेज असल्याचा गौप्यस्फोट राजपूत यांनी केला. पण आपल्याला १०० कोटी दिले तरी आपण शिवसेनेशी गद्दारी करणार नाही, अशा शब्दांत आमदार राजपूत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

उदयसिंग राजपूत औरंगाबादचे कन्नडचे आमदार आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत येऊ शकतात . शिवसेनेशी बंडखोरी करण्यासाठी मला ५० कोटीहून अधिकची ऑफर होती. बंडखोरी करण्यासाठी माझ्याकडे दोन चारचाकी भरुन पैसे आले होते, पण मी गद्दारी केली नाही. १०० कोटी दिले असते तरी मी गद्दारी केली नसती, असे राजपूत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेसोबत कोणतीही गद्दारी करणार नाही, असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाला दिवसेंदिवस नवीन वळण आले आहे. शिंदेंची सेना आणि उद्धव ठाकरेंची सेना आज सर्वोच्च न्यायालयात एकमेकांसमोर उभी ठाकणार आहे. सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरू होणार असून यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here