मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर आणि घरांवर शिवसैनिक धडत देत आहेत, कार्यालये फोडत आहेत, त्यांच्या फ्लेक्सला काळं फासत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय. आजपासून पुढील १५ दिवस म्हणजेच १० जुलैपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. कोणत्याही पक्षाने किंवा पक्षाच्या कार्यकर्त्याने कायदा हातात घेऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जमावबंदी लागू केल्यानंतर चार किंवा चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसैनिक पेटून उठले आहेत. राज्यातील विविध शहरात बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक निदर्शने करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात विशेषत: मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी काल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आज मुंबई पोलीस आयुक्तांनी मुंबई पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेविषयी चर्चा केली. त्यानंतर मुंबईत जमाव बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.