शहरात दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सुरूच,

0
14

जळगाव ः प्रतिनिधी
शहरात दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सुरूच आहेत. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने हा विषय गांभीर्याने घ्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून, आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

मेहरूण परिसरातील सुप्रीम कॉलनी, तांबापुरा व शहरातील अनेक भागांत दूषित व गढूळ दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना निवेदन दिले. आयुक्तांनी पाणीपुरवठा अभियंता गोपाळ लुले यांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत योग्य उपाययोजना करण्याची सूचना केली. राष्ट्रवादीचे सुनिल माळी, राजू मोरे, युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी, अमोल कोल्हे व कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हॉल्व्ह खराबचे कारण
शहराच्या बहुसंख्य भागात पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा झाला आहे. जलशुद्धीकरण केंद्राजवळील व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने बायपास पद्धतीने जुन्या व क्वचित वापरात येणाऱ्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात आला. यामुळे बायपास व मुख्य जलवाहिनीतील क्षार उसळल्याने पाण्याचा रंग बदलण्याचा दावा पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गोपाळ लुले यांनी केला.
आयुक्तांना नागरिकांचे साकडे
शहरातील समस्यांची यादी मोठी आहे; परंतु जळगावकरांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आधीच तापमानाने नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. त्यात अशुद्ध, दुर्गंधीयुक्त व दूषित पाण्यामुळे भर पडण्याची शक्यता आहे. नवनियुक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी सोडवावा, असे साकडे सर्वसामान्य नागरिक घालत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here