जळगाव : प्रतिनिधी
गेल्या तीन दशकांपासून केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासोबतच त्या शेतकऱ्यांमागे भक्कमपणे उभे राहण्याची भूमिका माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी घेतली आहे. त्यांनी दिलेल्या पाठबळामुळेच केळीला जागतिक बाजारात स्थान मिळाल्याचे प्रतिपादन जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष तथा केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी केले.
खासदार शरद पवार यांच्या संसदीय कार्याला 55 वर्षे झाल्यानिमित्त चांदसर येथे राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक विकास पवार यांच्या पुढाकाराने केळी परिसंवाद व केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी आमदार मनिष जैन, महाबनानाचे अध्यक्ष भागवतराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, तांदलवाडीचे शेतकरी प्रशांत महाजन, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, रिटा बाविस्कर, उमेश पाटील, धनराज माळी, नाटेश्वर पवार उपस्थित होतेे. डॉ. के. बी. पाटील यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. ‘केळीच्या जागतिक बाजारपेठ, निर्यातीच्या संधी’ याबाबत डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. आज जागतिक बाजारपेठ गाठताना केळी संदर्भातील 30 वर्षातील पायाभूत सुविधा महत्वाच्या ठरल्या. त्यात खासदार शरद पवारांचे मोठे योगदान असल्याचे डॉ. के. बी. पाटील म्हणाले. महाबनानाचे भागवतराव पाटील यांनी केळीबाबतच्या वॅगन मिळणे, ट्रान्सपोर्ट, केळीसाठी रेल्वेगाड्यांना थांबा देणे याबाबत शरद पवारांच्या योजनांचा उल्लेख केला. राष्ट्रवादीचे समन्वयक विकास पवार, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी प्रास्ताविक केले. चांदसरचे माजी सरपंच मुन्ना पवार, कुणाल कोठावदे, चंद्रकांत साळुंखे, संजय पाटील, रमेश पवार, शिवाजी पवार, युवराज पाटील उपस्थित होते.