मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेचा निषेध म्हणून आज चेंबूर पांजरापोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून तीव्र आंदोलन व निदर्शनं करण्यात आलं यावेळी प्रदेश अध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते.
यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता भाजपने महाविकास आघाडीवरती केलेला टीकेला उत्तर त्यांनी दिलं. आता कॅबिनेटच्या मिटींगसाठी कोर्टातच एक स्क्रीन लावावी लागेल या भाजप मंत्र्यांच्या व्यक्तव्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले, ‘तुम्ही सर्वांवर खोटे आरोप करून त्यांना तुरुंगामध्ये टाकण्याची भूमिका घेणार असाल, तर तसही करावं लागेलं, तुम्ही सर्वांना तुरुंगात घालायला लागला तर काय करणार, तुमच्या खोट्या आरोपावरुन आम्ही थोडंच राजीनामा घेणार आहे असं म्हणत त्यांनी मलिकांचा राजीनामा (Resigned) घेणार नसल्याचही स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले, ‘ भाजप सारखी आम्ही सुडाची भावना ठेवत त्या भावनेतून आम्ही कोणावरती कारवाई करणार नाही राजकारणात तसं करायचही नसतं असंही ते म्हणाले. शिवाय भाजप असे किती खोटे आरोप करणार आणि असे किती लोकांना अटक करणार, तरी सुद्धा महाविकास आघाडी शांत बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, ते म्हणाले, ‘आतापर्यंत राज्य सरकारकडे भाजपचं लक्ष होतं आता मुंबई महापालिकेकडे लक्ष आहे. मुंबईकरांना आणि राज्यातल्या जनतेला कळतं की कशा पद्धतीने तपास संस्थांचा गैरवापर केला जात आहे.’



