सोयगाव : प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी किल्ला व अजिंठा लेणी परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यस्तरीय पर्यटन विकास योजनेतून 5 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून याबाबत तातडीने अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे.
सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याने महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मतदारसंघातील किल्ले संवर्धन व पर्यटन संख्येत वाढ व्हावी यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जंजाळा किल्ला, वेताळवाडी किल्ला, घटोत्कच लेणी, अजिंठा लेणी इत्यादी भागाची पाहणी करून येथे तातडीने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या काही प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. यात वेताळवाडी किल्ल्याला जाणारा जोड रस्ता सिमेंट काँक्रीट बांधकाम करणे ( भाग 1 ) 30 लाख , वेताळवाडी किल्ल्याला जाणारा जोड रस्ता सिमेंट काँक्रीट बांधकाम करणे ( भाग 2 ) 30 लाख, अजिंठा लेणी ( फर्दापूर ) येथे पर्यटकांसाठी यात्री निवास बांधकाम करणे 1 कोटी 99 लाख , अजिंठा लेणी येथे धम्मांचलाच्या ठिकाणी यात्री निवासाचे बांधकाम करणे 1 कोटी 99 लाख, असे जवळपास 5 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्राला भरीव निधी
राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाड्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारसंघातील किल्ले व लहानमोठ्या पर्यटन स्थळांचा विकास साधता येणार आहे. अजिंठा या जागतिक दर्जाच्या ठिकाणी सामूहिक सुविधा केंद्र पुन्हा सुरू होणार आहे. तसेच फर्दापूर येथील आरक्षित जमिनींचा विकास साधून पर्यटकांसाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येईल. जेणे करून येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ होवून येथील पर्यटन व्यवसायातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल.
– राज्यमंत्री अब्दुल सत्तार