यावल : प्रतिनिधी
यावल शहर परिसरासह तालुक्यात शेती शिवारात व इतर ठिकाणी जिवंत वृक्षांची भर दिवसा वृक्षतोड करण्यात येत असून अनेक शेतकरी तोंडी व लेखी तक्रारी करीत आहे तरी सुद्धा महसूल व वन विभाग आणि पोलिसांतर्फे ठोस कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल येथील योगेंद्र प्रदीप महाजन गटनंबर 842,दिनेश श्रावण बोरसे यांनी गट नंबर 2094 मधील जिवंत वृक्षतोडीबाबत आणि इतरांनी वेगवेगळ्या ठिकाणी शेती शिवारात जिवंत वृक्षतोड केली जात असल्याच्या स्वतंत्र लेखी तक्रारी अनुक्रमे दि.29/4/2022 व दि.10/5/2022रोजी यावल पोलीस,तहसीलदार यावल, वनपरिक्षेत्र अधिकारी यावल यांच्याकडे केलेल्या आहेत.
परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही ठोस कार्यवाही न करता निष्क्रिय भूमिका निभावत कारवाई केल्याचा कांगावा करीत तक्रारदार आणि संबंधित यांच्याविरुद्ध कागदोपत्री कारवाई करून आप-आपसात भांडण केल्यास पुढील कारवाई करण्यात येईल अशाप्रकारे दोघांकडून जाब जबाब घेऊन वृक्षतोड थांबवण्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही करीत नसल्याने तसेच संबंधित अधिकाऱ्यांना लेखी कळविले जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.तरी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी कायदेशीररीत्या समन्वय साधून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी असे बोलले जात आहे.