मुंबई : प्रतिनिधी
उद्या होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडत असताना विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेनेही वेग धरला आहे. येत्या २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे खडसे आणि निंबाळकर हे दोघेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या विधानपरिषद निवडणुकीसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथराव खडसे हे उमेदवार असतील. दोन्ही उमेदवार विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.