ओझर प्रतिनिधी
ओझर :- येथील एच ए एल कंपनीच्या सी एस आर निधीतून नव्याने बांधकाम करून देण्यात आलेल्या जि प प्राथमिक शाळेत पहिल्या इयत्तेत दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे पावले उमटवत तसेच त्यांचा सेल्फी फोटो घेत विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव मोठया आनंदात साजरा करण्यात आला.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर मुले क्र २ या शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना आपला शाळेचा पहिला दिवस सदैव स्मरणात रहावा यासाठी विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे उमटविण्यात आले व सेल्फी पॉईंट वर सेल्फी देखील घेण्यात आले.सर्वप्रथम विद्यार्थ्यांसोबत पुस्तकांची दिंडी वाजत गाजत काढण्यात येऊन पहिलीच्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देत औक्षण करत स्वागत करण्यात आले.त्यानंतर शाळा पुर्व तयारी भाग २ चेही आयोजन करण्यात येऊन त्यात सात स्टॉल लावण्यात आले यात प्रत्येक विद्यार्थ्यांला आनंद मिळेल व त्याचे शाळेत येण्यास मन आकर्षित होण्यासाठी अतिशय सुंदर व आकर्षक शैक्षणिक साधनांचा समावेश करण्यात आला.विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नोंदवून त्यांना विकास पत्र देण्यात आले. विद्यार्थ्यांना पुस्तकांचे व गणवेशाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.मध्यान्ह भोजनाच्या वेळी विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नितीन पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन आढाव ,शालेय समिती अध्यक्ष पांडुरंग आहेर,पालक चंद्रकांत पारधे,संजय झोटींग, सरला गोधडे, शोभा बोधक ,मुख्याध्यापिका रजनी सोनवणे,उपशिक्षिका कुसुम जाधव, मीरा बिरारी, सुनंदा सूर्यवंशी,ज्योती चव्हाण , निर्मला पेखळे,उपशिक्षक नितीन देसले ,सुमन तडवी,योगेश्वरी खैरनार,वंदना धरमखेले, दिपाली साळुंके ,सोमनाथ राऊत आदींसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.