विजेत्यांसाठी 10 लाखांची बक्षिसे ः इतर राज्यातूनही संघ येणार

0
30

जळगाव ः प्रतिनिधी  
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे 8 ते 13 एप्रिलदरम्यान सहादिवसीय राष्ट्रीय बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी भारतभरातील नावाजलेले 10 पुरुष व महिला ग्रँडमास्टर, 13 आंतरराष्ट्रीय मास्टर व फिडे मास्टर, राज्य संघटनेमार्फत चार अधिक एक राखीव संघ पाठवले जाणार असल्याची माहिती काल संघटनेने पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय दर्जाची स्पर्धा जळगावमध्ये आयोजित होत असल्याने जळगावसह महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. स्पर्धेतील प्रत्येक डावाचा कालावधी 90 मिनिटे व प्रत्येक चालीसाठी 30 सेकंद वाढीव वेळ राहणार आहे. ही स्पर्धा जळगावातील प्रेसिडेंट कॉटेज रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची 10 लाखांची बक्षिसांची रक्कम विजेत्या संघांना प्राप्त होणार असून पुरुष व महिला गटात समसमान अशी 5 लाखांची रोख बक्षिसे वितरित केली जातील.
स्पर्धा आयोजन समितीचे चेअरमन अशोकभाऊ जैन, संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया यांच्या मार्गदर्शनात जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे, विवेक आळवणी व जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सदस्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
मोबाइल प्रीमियर लिग फाउंडेशन (एमपीएल) व स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया (साई) या संस्था अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाशी करारबद्ध असून या स्पर्धेचे प्रायोजकत्व जैन इरिगेशन सिस्टिम लि.चे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी स्वीकारले असल्याची माहिती  पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, सहसचिव शकील देशपांडे, जैन अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशापांडे, रविंद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे उपस्थित होते.
 स्पर्धेत होणारे खेळाडू
ग्रँडमास्टर दीपण चक्रवर्ती, स्वप्निल धोपाडे, आर. आर. लक्ष्मण, श्रीराम झा, विघ्नेश, श्‍याम निखिल, अर्घ्यादीप दास, सी. आर. जी कृष्णा, सायंतन दास, दिनेश शर्मा पुरुष गटात, महिला गटात महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे, किरण मनीषा मोहंती, मेरी गोम्स, दिव्या देशमुख, सौम्या स्वामिनाथन, पद्मिनी राऊत, ईशा करवडे, निशा मोहोता, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर प्रणाली धारिया, साक्षी चितलांगे, तेजस्विनी सागर, महिला फिडे मास्टर बोमिनी मोनिका अक्षया, तोषाली, महिला कँडिडेट मास्टर वैष्णवी सहभागी होणार आहेत.
     हे संघ होणार सहभागी
पुरुष गटात एलआयसी ऑफ इंडिया, ऑल इंडिया रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स, सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड आरएसपीबी टीम, महाराष्ट्रासह तामिळनाडू संघ, आंध्र संघ, बिहार, केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्‍मीर, मध्य प्रदेश आदी संघांनी सहभाग निश्चित केला आहे. तर महिला गटात महाराष्ट्रासह आंध्र, गुजरात, ओडिशा, बिहार, हिमाचल प्रदेश आदी राज्य संघ तर पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचा संघ स्पर्धेत सहभागी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here