विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी
दि. 02/06/2022 रोजी मौजे घोसला येथील राखीव वनात काही अज्ञात इसम शिकार करण्याच्या उद्देशाने संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची गुप्त माहिती वनविभागास मिळाली होती. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ त्यांच्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सापळा रचून 8 जणांना रानडुकराची शिकार करताना रंगेहात पकडले. त्यानंतर सदरील आरोपींना अटक करून दिनांक 03/06/2022 रोजी मा. न्यायालयासमोर हजर केले असता पुढील तपासासाठी मा. न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची वनकोठडी सुनावली. दि. 06/06/2022 रोजी त्यांना पुन्हा न्यायालयीन कोठडीकरीता मा. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सशर्त जमीन मंजुर केला आहे परंतु आरोपींनी अटी व शर्तीचे पालन न केल्याने त्यांची हर्सूल जेलला रवानगी करण्यात आली आहे. यावेळी वनविभागाच्या वतीने तपासी अधिकारी राहुल सपकाळ व सहायक सरकारी अभियोक्ता जावेद परकोते यांनी बाजू मांडली तर आरोपीच्या वतीने महाजन यांनी काम पाहिले.
सदरील प्रकरणी पुढील तपास मा. सूर्यकांत मंकावार उपवनसंरक्षक औरंगाबाद , श्रीमती पुष्पा पवार, सहाय्यक वनसंरक्षक सिल्लोड प्रा. यांच्या मार्गदर्शनखाली श्री राहुल सपकाळ वनपरिक्षेत्र अधिकारी, सोयगाव प्रा. हे करीत आहेत. सदर कार्यवाहीत श्री एन. डी.काळे वनपाल बनोटी, वनरक्षक श्री वाय. एस. बोखारे, श्री एन. ए. मुलताने , श्री व्ही आर. नागरे, श्री जी. टी. नागरगोजे, श्री एस. हिरेकर, श्री एस टी चेके, वनसेवक झाल्टे, दशरथ पंडित, झामु पवार,कृष्णा पाटील आदीचा सहभाग होता.
बदलीच्या कार्यमुक्तीच्या दिवशी केली कारवाई
वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांनी सोयगाव वनपरिक्षेत्र चा कार्यभार घेतल्या पासुनच अवैध कृत्यांवर धडक कारवाईचे सत्र सुरू केले होते त्यामुळे वन तस्करांना पळता भुई कमी झाली होती व अवैध धंद्यांना चांगलाच चाप बसला होता. नुकतीच त्यांची बदली झाली असून त्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश येवून धडकलेले होते त्याअनुषंगाने नवीन वनपरिक्षेत्र अधिकारी देखील रुजू होण्यासाठी आलेले होते त्याच दरम्यान त्यांना वन्यप्राणी रानडुक्कराच्या शिकारीबाबत माहिती प्राप्त झाली लगेचच ते पथकासह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व त्याठिकाणी त्यांनी आठ आरोपींना जेरबंद केले.
जरंडी येथील बिबट प्रकरणातील आरोपी अजूनही कारागृहात
माहे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मौजे जरंडी येथील बिबट शिकार प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या पथकाने केवळ 48 तासातच आरोपींचा छडा लावला व आरोपीला ताब्यात घेतले. सदर प्रकरणातील आरोपी मागील तीन महिन्यापासून कारागृहातच असून अजूनही आरोपीला जामीन मिळालेला नाही तसेच केळगाव येथील वन्यप्राणी रानडुक्कर व देव्हारी येथील खवले मांजर अवैध शिकार प्रकरणीसुद्धा मा. न्यायालयाने सर्व आरोपींचा जामीन नामंजूर करून त्यांची हरसुल जेलला रवानगी केली होती हे विशेष. त्यामुळे कोणीही वन्यप्राण्याची शिकार करू नये असे आवाहन वनविभागाने केले आहे.