चोपडा : प्रतिनिधी
येथील वनविभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी शासनाच्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला हरताळ फासून त्यांच्या कर्मचार्यांना हाताशी धरुन सातपुडा बोडका करून टाकला आहे. वृक्षतोडीचे काम जोमाने सुरू आहे. या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपजिल्हाध्यक्ष अमृतराज सचदेव थेट मुख्यमंत्र्याकडे केली
आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या काही वर्षांत जेवढी वृक्षतोड झाली नाही तेवढी वृक्षतोड मागील दोन वर्षांत झाली आहे. त्याचप्रमाणे डिंक शासकीय नियमाप्रमाणे फक्त आदिवासींनाच काढण्याची परवानगी असते व त्याअनुषंगाने प्रत्येक गावात एक समिती स्थापन करुन त्यासमितीला तो अधिकार असतो. मात्र आदिवासींना डावलून काही दलाल डिंकाचा काळाबाजार करीत आहेत. तसेच शासनाला कुठलाही न भरता काळ्या बाजारात खुलेआम विक्री करत आहेत.
यामुळे आदिवासी बांधवांच्या अधिकारावर एकप्रकारे गदा आणली जात आहे. डिंकाचा काळाबाजार करणाऱ्या दलालांनी चोपडा शहर व तालुक्यात ठिकठिकाणी गोदाम तयार केले आहेत. त्याठिकाणी डिंकाचा साठा करून कुठलाही कर न भरता काळ्याबाजारात विक्री करीत आहेत. या सर्व बाबींकडे अधिकारी वर्गाचे पूर्णपणे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे.