जळगाव : प्रतिनिधी
लग्नासाठी गेलेल्या व्यक्तीचा बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह टीव्ही चोरून नेल्याची घटना शहरातील दांडेकर नगरात मंगळवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सेवानिवृत्त अरविंदराव निकम असे घर मालकाचे नाव आहे. निकम हे पुतण्याच्या लग्नासाठी धुळ्याला गेले होते. त्यामुळे दांडेकर नगरातील घर कुलूपबंद होते. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला.
दागिने चोरी
लग्नसमारंभ आटोपून अरविंदराव निकम हे मंगळवार, दि. २२ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दांडेकर नगरातील घरी परतले. त्यावेळी त्यांना घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप दिसून आले नाही. घराच्या मागील बाजूस गेल्यानंतर मागील दरवाजाही अर्धवट उघडा असल्याचे त्यांना दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर हॉलमधील टीव्ही जागेवर नव्हता. तसेच दीड किलो वजनाचे चांदीचे ताट, वाटी, चमचा, ग्लास व कुंकवाचा करंडा, चांदीचे पान, पूजेचे साहित्य व तीन ग्रॅम वजनाचे मंगळसूत्रसुध्दा गायब झालेले आढळू आले. अखेर घरात चोरी झाल्याची त्यांना खात्री झाली. घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर निकम यांनी लागलीच रामानंदनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून चोरट्यांचा शोध सुरु आहे.