साईमत, शिरपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलगी अल्पवयीन असतांना तिचे लग्न लावून दिले. त्यानंतर वैवाहिक संबंधातून गर्भधारणा झाल्याने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात तिने गुरुवारी, ३ ऑगस्ट रोजी एका बाळाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेची वडील मयत झाले असून आईने दुसरे घर केल्याने पालनपोषण करणाऱ्या आजीने अवघ्या १५ वर्षे वयाच्या मुलीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर १६ व्या वर्षीच मुलीला गर्भधारणा होऊन तिच्यावर मातृत्व लादले गेले. हा प्रकार शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आजीसह पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, शिरपूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे तिच्या आजीने २०२२ मध्ये लग्न लावून दिले. तेव्हा तिचे वय १५ वर्षे होते. लग्नानंतर काही महिन्यांतच तिला गर्भधारणा झाली. दरम्यान, ही मुलगी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर गुरुवारी पहाटे प्रसूत झाली. प्रसूत विवाहिता अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन मुलीचा जबाब नोंदवून अत्याचार, पोस्को आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास पी.एस.आय. दरवडे करीत आहे.