रोजगाराच्या संधी हाताळण्यासाठी तरुणांना प्रशिक्षित करणे काळाची गरज बोदवडला ‘निर्माण ‘चे कार्यक्रम संचालक अमृत बंग यांचे आवाहन

0
10

साईमत बोदवड प्रतिनिधी

मी माझ्या आयुष्यात काय करावे? या प्रश्नाचे उत्तर आपले करियर करत असतांना शोधणे महत्त्वाचे आहे, तरुणांना समाजातील रोजगारासाठी महत्त्वाच्या संधी हाताळण्यासाठी प्रशिक्षित करणे ही काळाची गरज आहे. असे आवाहन ‘निर्माण ‘चे कार्यक्रम संचालक अमृत अभय बंग यांनी केले. वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजसेवक पद्मश्री सन्मानित डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचे ते सुपुत्र आहेत .

बोदवड येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी आभासी पद्धतीने बंग यांचे व्याख्यान घेण्यात आले. ‘ निर्माण: अर्थपूर्ण करिअरच्या शोधात ‘ या विषयावर घेण्यात आलेल्या सदर कार्यक्रमाचे आयोजन रेमेडियल व ब्रिज कोर्स समितीतर्फे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

संस्थेचे चेअरमन मिठूलाल अग्रवाल यांच्या प्रोत्साहनातून घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी होते. यावेळी डॉ.रूपेश मोरे, कांचन दमाडे, नितेश सावदेकर, विशाल जोशी , डॉ.वंदना नंदवे, डॉ.अमर वाघमोडे , डॉ.धीरेंद्रकुमार यादव, निलेश महाजन, प्राध्यापक बांधव आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्वलंत सामाजिक समस्या समजून घेण्याची आणि सोडवण्याची इच्छा आणि क्षमता असलेल्या तरुण व्यवसायिकांचा एक मोठा गट तयार करणे हे निर्माण चे उद्दिष्ट आहे.निर्माणतर्फे आयोजित शिबिरे, त्यांची निवडप्रक्रीयेविषयी विविध शिबिरार्थीचे कार्य याची माहिती दिली. केवळ व्यवस्थेला नाव न ठेवता त्यामधील कच्चे दुवे शोधून त्यावर करियर कसे करता येईल हे पाहणे गरजेचे आहे. यासाठी आशा सेविका ही संकल्पना निर्माण करणारे डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचे कार्य उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले.
गडचिरोली सारख्या आदिवासी ग्रामीण भागात तेथील आरोग्य आणि शिक्षण समस्यांवर फार मोठे कार्य केलेले आहे त्यांच्या संशोधनामुळे बालमृत्यूचे ,कुपोषणाचे व स्त्रियांच्या आजारांचे प्रमाण कमी झाले. नवजात बालमुत्यू रोखणारे हेच कृती मॉडेल पुढे पाकिस्तान नेपाळ बांगलादेश आणि साऊथ आफ्रिकेतील काही देशांमध्ये वापरले जात आहे.निर्माण संस्थेपासून प्रेरणा घेऊन अनेक तरुणांनी लोकांच्या समस्या सोडवत स्वतःची करिअरची वाट निवडली आहे.असे अनेक विचार स्वतःच्या खुमासदार शैलीत श्री. बंग यांनी विद्यार्थ्यासमोर व्यक्त केले .थेट विद्यार्थ्यांच्या वयोपातळीवर जाऊन बंग यांनी सुसंवाद साधल्याने विद्यार्थी वैचारिकदृष्ट्या ओतप्रोत झाले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांनाही सहजपणे उत्तरे दिली.
प्रास्ताविकात डॉ.रुपेश मोरे यांनी दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील निर्माण व तिची पालकसंस्था सर्च , तारुण्याभान उपक्रम राबविणाऱ्या डॉ.राणी बंग यांच्याविषयी सखोल माहिती दिली. तसेच गांधी व विज्ञान मानणारे डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांच्या आदिवासी भागातील बालमृत्यू , व त्यावरील उपाययोजना, रोजगार हमी योजनेतील मजुरीचा दर याविषयी केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला.आपल्या अध्यक्षीय भाषणात नवजात बालमुत्यूवरील डॉ. अभय बंग यांनी केलेला महत्त्वाचा रिसर्च पेपरमुळेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाव्दारे आशा सेविकांची निर्मिती झाली आहे. म्हणून तरुणांनी समाजोपयोगी संशोधन करावे असे आवाहनही प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रुपेश मोरे यांनी केले.सूत्रसंचालन डॉ. वंदना नंदवे आणि आभार प्रदर्शन विशाल जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समीर पाटील, राजू मापारी, वैभव पाटील आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here