साईमत, अक्कलकुवा । प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या बिजरी गव्हाण येथील रेशन दुकानदार गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ग्रामस्थांना रेशनच देत नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी भर पावसात ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. रेशन मिळत नसल्याने थेट नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्यापर्यत पाठपुरावा करुनही न्याय मिळत नसल्याने गावकऱ्यांनी या मोर्चातून आपला रोष व्यक्त केला.
गेल्या सहा महिन्यात गावात फक्त एकदाच रेशन वाटप झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या रेशन दुकानदाराचे परवाना तात्काळ स्थगित करुन अन्य यंत्रणेमार्फत रेशन लागलीच उपलब्ध करुन देण्याची मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. अपुरे रेशन देवून पूर्ण रेशनवर सही घेणे, महिनोन्महिने रेशनचा पुरवठा न करणे अशा अनेक तक्रारी निवेदनातून ग्रामस्थांनी केल्या आहे. भर पावसात निघालेल्या मोर्चातील ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे याठिकाणच्या रेशन दुकानदारांवर झालेले आरोप पाहता याबाबत प्रशासनाने शहानिशा करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.