राहुल गांधी 137 दिवसांनी संसदेत परतले

0
10

साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था

लोकसभेचं सदस्यत्व बहाल केल्यानंतर राहुल गांधी आज सोमवारी (7 ऑगस्टला) संसदेत पोहोचले. राहुल गांधी 137 दिवसांनंतर संसदेत पोहोचले आणि विरोधी पक्षांच्या आघाडीच्या खासदारांनी म्हणजेच इंडीयाच्या खासदारांनी त्यांचं स्वागत केलं. यामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचाही समाव्ोश होता. संसद परिसरात पोहोचल्यावर राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

त्याआधी राहुल गांधी यांनीही आपला ट्विटर बायो बदलला. यामध्ये त्यांनी खासदार असा उल्लेख केला आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाडचे खासदार आहेत. मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (4 ऑगस्ट) राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. यानंतर लोकसभा सचिवालयाकडून आज अधिसूचना जारी करुन राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आले. काँग्रेस नेत्यांनी एकमेकांना लाडू भरवले दरम्यान राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व बहाल केल्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लाडू खाऊ घातला. यानंतर खरगे यांनी बाकीच्या नेत्यांना लाडू भरवला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, राहुल गांधी यांना सदस्यत्व बहाल करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.

भारतातील लोकांसाठी आणि विशेषत: वायनाडच्या लोकांसाठी हा दिलासा आहे. भाजप आणि मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात जो काही व्ोळ शिल्लक आहे त्याचा वापर करुन विरोधी नेत्यांना लक्ष्य करुन लोकशाहीला बदनाम करण्याऐवजी खऱ्या कारभारावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर सचिन पायलट म्हणाले की, सत्याचा विजय झाला. जनतेचा आवाज पुन्हा संसदेत बुलंद होईल. राहुल गांधी यांना लोकसभेचं सदस्यत्व बहाल केल्याने लोकशाही वाचवण्यासाठी आणि सार्वजनिक समस्या मांडण्याच्या लढ्याला नवं बळ मिळेल. उज्ज्वल भविष्याचा पाया रचून भारताला सक्षम बनवण्याच्या दिशेने सर्वजण एकत्रितपणे पुढे जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here