मुंबई : प्रतिनिधी
भाबडेपणात रमणारे विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ हे शुक्रवारी अचानक विरोधीपक्ष असलेल्या भाजपच्या प्रेमात पडले आणि नकळत त्यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी सही केली. विरोधकांच्या स्वाक्षरी मोहिमेची त्यांना कल्पना नव्हती कल्पना नसलेल्या झिरवाळांनी विरोधक आमदारांचा गोतावळा बघत सही केली, आणि काही क्षणातच चूक कळताच कपाळावर हात मारून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली.
दरम्यान, त्याच वेळी त्या ठिकाणी हसन मुशरीफ आले , त्यांनी ही पेन हातात घेतला सही करणार, तोच त्यांनी प्र्श्न विचारला की सही कश्यासाठी त्यात कोणी तरी बोलले की, मलिक यांच्या राजीनाम्या साठी , आणि मग सही न करता हातात घेतलेला पेन घेऊन निघून गेले . दरम्यान, यावेळी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या एका नेत्यांचा पाठिंबा मिळाल्याने विरोधकांच्या मागणीला जोर येऊन घोषणाबाजी रंगली.
मलिक यांच्या जमीन व्यवहाराचा संबंध अंडरवर्ल्ड दाऊद इम्राहिमशी जोडून त्यांच्या राजीनाम्यावर अडून बसलेल्या विरोधकांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही आपली भूमिका कायम ठेवली. कामकाजाला सुरवात होण्याआधीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सही आंदोलन सुरू केले.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात या मुद्यावरून ठाकरे सरकारला ‘टार्गेट’ केले. मलिक यांच्यावर देशद्रोही असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहे. मलिक यांच्या राजीनाम्यावरून भाजपने सरकारची कोंडी केली असली तरी मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. या मुद्यावरून सरकार-विरोधकांतील संघर्ष वाढत असतानाच झिरवाळ यांच्या सहीने मात्र, विरोधकांना काही वेळापुरतेही का होईना चांगले बळ मिळाले.