जळगाव : प्रतिनिधी
राज्यस्तरीय वरिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्हा संघाने सुवर्ण कामगिरी केली आहे. स्पर्धेत डॉ. वृषाली पाटील यांनी तिहेरी मुकुट पटकावला. या स्पर्धेत जिल्हा व्हेटरन्सच्या डॉ. वृषाली पाटील, डॉ. सारंगा लोखंडे, चेतना शहा, सुनिल रोकडे, डॉ. संदीप पाटील, कीर्ती मुणोत हे खेळाडू सहभागी झाले होते.
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आयोजित वरिष्ठांची राज्यस्तरीय स्पर्धा लातूर येथे नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत डॉ. वृषाली पाटील एकेरीत अंतिम सामन्यात 50 वर्षांवरील गटात अर्चना सिंग हिचा 21-15, 19-21, 21-18 असा पराभव केला. तर मिश्र दुहेरीत डॉ. पाटील व किरण माकोडे यांनी आनंद विठ्ठलकर व अर्चना सिंग या जोडीचा सरळ दोन गेममध्ये 21-10, 21-16 असा पराभव केला. तर 46 वर्षांवरील गटात महिला दुहेरीत डॉ. पाटील व नाहेद दिवेचा यांनी सरिता जेटवाणी व अजिता रवींद्रन यांनी सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. डॉ. पाटील यांना दीपक आर्डे यांनी मार्गदर्शन केले.