राज्यपालांनी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, त्वरित विधान मागे घ्या

0
81

मुंबई: प्रतिनिधी
चाणक्याशिवाय चंद्रगुप्तांना कोण विचारेल. समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल. गुरुचं महत्त्व खूप मोठं असतं, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. कोश्यारी यांच्या या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोर्टाची कागदपत्रं पोस्ट करत राज्यपालांचं म्हणणं खोडून काढलं आहे. तर नाशिक जिल्हा राष्ट्रवादीने राज्यपाल हटाव मोहीम सुरू करून राष्ट्रपतींना पत्रं पाठवण्यास सुरुवात केली आहे. आता या वादात खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांनी आपलं विधान त्वरीत मागे घ्यावे, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे. त्यामुळे आता या वादावर राज्यपाल काय प्रतिक्रिया देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
खासदार उदयनराजे यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, असं ट्विट उदयनराजे यांनी केलं आहे.
सुप्रिया सुळेंचा आक्षेप
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्यपालांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. सुप्रिया सुळे यांनी या संदर्भातील कोर्टाची कागदपत्रे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एक व्हिडीओ पोस्ट करून राज्यपालांचं म्हणणं खोडून काढलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. 16 जुलै 2018 रोजी दिलेल्या निकालानुसार… ‘तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही.’ असं सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काय म्हणाले राज्यपाल ?
राज्यपाल काल औरंगाबादेत होते. तापडिया नाट्यमंदिरात एकदिवसीय श्री समर्थ साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. आपला समाज आणि राष्ट्र बलशाली होण्यासाठी संत विचारांचा प्रवाहीपणा आवश्यक असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले, आपल्या देशात समृध्द गुरूपरंपरा चालत आलेली आहे. मानवी जीवनामध्ये सदगुरू लाभणे ही मोठी उपलब्धी आहे. चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरू का बडा महत्त्व होता है, असं वादग्रस्त विधान राज्यपाल यांनी केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here