रस्त्यात खड्डे की जळगावकरांचं

0
25

गेल्या तीस वर्षापुर्वी जळगाव हे राज्यातील एक विकसनशील शहर म्हणून ओळखले जात असे,त्याचे श्रेय कोणीही सुरेशदादा जैन यांना दिल्याशिवाय राहणार नही मात्र गेल्या सात-आठ वर्षापासून या शहराला कोणाची नजर लागली की, जळगावचं पार वाटोळं झाल्याची तीव्र प्रतिक्रिया अनेक जळगावकरांनी व्यक्त केल्यास नवल वाटू नये.शहरात फिरतांना त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही.शहरातील विस्तारीत भागातील रस्त्यांची तर पार दुरवस्था झाली असून त्याकडे मनापाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यास किंवा अधिकाऱ्यास बघायला वेळ आहे कुठे…
अहो,हे तर सोडा परंतु शहरातील एक-दोन रस्ते सोडले तर सर्व प्रमुख रस्त्यांची इतकी दुरवस्था झाली आहे की,रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हे समजायला मार्ग नाही.
जळगावची जनता किती सहनशील आहे हे त्यापेक्षाही भयंकर म्हणावे लागेल.रिक्षा चालकांसह सर्व वाहनधारक हे कसे निमूटपणे सहन करतात,हे न उलगडणारे कोडे आहे.रस्त्याने चालतांना लागणाऱ्या दणक्यांमुळे मानेचे,पाठीच्या कण्याचे व कमरेचे आजार वाढले आहेत.त्याबद्दल ते रस्त्यावरच संताप व्यक्त करतात मात्र तो तेवढ्यापुरताच. तो संताप आंदोलनाव्दारे व्यक्त होत नाही.राजकीय पक्ष सोडा, सामाजिक संस्थाही य़ा प्रश्‍नी चिडीचुप आहेत. त्यामुळे मनपाचे पदाधिकारी व अधिकारी आपआपल्या धुंदीत राहतात .त्यांना जनतेच्या हालअपेष्टांशी काहीही देणेघेणे दिसत नाही.केवळ आपण नविन रस्ते तयार होण्यासाठी किती प्रयत्नशिल आहोत,त्यासाठी आपली धडपड किती,हे जळगावकरांना दाखविण्यासाठी प्रचार व प्रसार माध्यमांव्दारे वारंवार दाखविले जाते मात्र प्रत्यक्षात एखादा अपवाद वगळला तर पावसाळा संपून तीन महिने उलटत आले तरी शहरातील एक मुख्य रस्ता पूर्ण होत नाही,यास कोणती कार्यक्षमता म्हणावी की,जळगावकरांना पुन्हा लॉलीपॉप दाखवणे सुरु तर नाही ना,अशी शंका उपस्थित झाल्यास नवल वाटू नये.
महानगरपालिकेवरील सुरेशदादा जैन गटाची सत्ता जळगावकरांनी उलथवली कारण एक वर्षात जळगावचं भलं होईल त्याचबरोबर आपल्यालाही नागरी सुविधा मिळतील या अपेक्षेने जनतेने भाजपाला प्रचंड बहुमत दिले.तत्कालीन मंत्री गिरीश महाजनांच्या ‘एक वर्षात जळगावचा कायापालट करु’ या ग्वाहीला बळी पडत जनतेने हा विजय पदरात टाकला मात्र एक वर्ष काय,अडीच वर्षे उलटून गेलीत तरी साधे रस्तेही झाले नाहीत.लोकांच्या तोंडाला पाने पुसण्यात आलीत आणि नागरिकांनी भाजपाच्या आपआपल्या नगरसेवकांना जाब विचारण्यास सुरुवात केली,नव्हे त्यांचा पिच्छा पुरविला.नाईलाजाने नगरसेवकांना भाजपापासून दूर जात वेगळा गट निर्माण करीत शिवसेनेला पाठिंबा देण्याचा नाईलाजाने निर्णय घ्यावा लागला.मनपावर शिवसेनेचा भगवा फडकला आणि जळगावकरांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या.
आतातरी कामे होतील,अशी आशा निर्माण झाली.सत्तारुढ कामालाही लागले.जिल्हा पालकमंत्र्यांनी राज्य शासनदरबारी आपल्या ताकदीचा उपयोग करुन मनपाला निधीही उपलब्ध करुन दिला.आता रस्तांची कामे मार्गी लागणार,म्हणूनजनतेनेही सुटकेचा निःश्‍वास सोडला पण अखेर जळगावकरांच्या नशिबी यातनाच यातना दिसत आहे.मनपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये म्हणा की,अधिकाऱ्यांमध्ये नियोजनाची फार मोठी दरी दिसत आहे.
कोणी म्हणतं,लवकरचं रस्त्यांची कामे पूर्ण होणार तर कोणी म्हणतं,अमृत किंवा भुयारी गटार योजनेची कामे अपूर्ण असल्याने रस्त्याच्या कामांना विलंब लागणार,नक्की काय देव जाणे.
देवाचं काय घेऊन बसलात.जळगावकरांचा राजकीय नेत्यांवरील,मनपाच्या पदाधिकाऱ्यांवरील विश्‍वास केंव्हाच ढासळला आहे.जो देवावर विश्‍वास होता,तो देखील हळूहळू ढासळू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे मात्र देवाचा धावा करीतच ते खडतर रस्त्यावरुन जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करीत आहे.आज नाही तर उद्या,रस्त्यांची कामे मार्गी लागतील व आपल्या हालअपेष्टा थांबतील या आशेवर ते आजही जगत आहे,रस्त्यावरील चढउतार वरुन धक्के खात,खड्ड्यात पडता पडता कसाबसा तोल सावरत आजचा दिवस पास करीत आहे.कधीतरी तर झोपल्याचे सोंग घेणाऱ्या स्थानिक आमदारांना, मनपा पदाधिकाऱ्यांना व आयुक्तांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना ख़डबडून जाग येईल या आशाळभूत नजरेने जळगावकर आजही त्यांच्याकडे बघत आहेत.महापौरांनी या प्रश्‍नाची दखल घेत काल मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेतली खरी पण अशा बैठका यापुर्वीही झाल्या असून त्या निष्प्रभ ठरल्या आहेत.
एवढंच कशाला,स्वातंत्र्य चौक ते नेरी नाका चौकापर्यतच्या
रस्त्याच्या कामाची ओरड झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह मनपा आयुक्तांनीही पाहणी केली व ठेकेदाराकडून रस्त्याची पाच वर्षाची हमी लिहून घ्यावी असे ठरले.मात्र प्रत्यक्षात जे काही मोजके रस्ते तयार होत आहे त्याच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात आहे,त्यात काही अंशी का होईना तथ्थ आहेच पण त्याकडे लक्ष कोण देणार,त्याचा टक्केवारीवर परिणाम होण्याची भीती नाकारता येत नाही.वाहनधारकांना रस्त्यावरील खड्डे बुजून सपाटीकरण झाले तरी फार मोठा दिलासा मिळणार आहे.नशिब तेवढं तरी खुललं हेच समाधान आणि जीव खड्ड्यात पडण्याऐवजी भांड्यात पडल्याचा आनंद जळगावकरांच्या चेहऱ्यावर दिसून येणार आहे.नंतर मनपातील सत्ताधारी आम्ही रस्त्यांचा गंभीर प्रश्‍न मार्गी लावल्याचे श्रेय घेत आपली पाठ थोपटून घेणार. त्यांनी शहरातील रस्ते जर चकचकीत केले तर श्रेय का घेऊ नये,हा देखील प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो.काहीही होवो, रस्त्यांचे भाग्य उजळणार आणि वाहनधारकांचे,पायी चालणाऱ्यांचे पर्यायाने जळगावकरांचे चांगभलं होणार हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here