रशियाचे युक्रेनवर चौफेर हल्ले : 74 लष्करी तळ उद्ध्वस्त

0
81

मॉस्को : वृत्तसंस्था:     नोव्हेंबर महिन्यापासून वर्तविण्यात आलेली रशिया-युक्रेन युद्धाची भीती अखेर गुरुवारी खरी ठरली. रशियाने युक्रेनवर चौफेर हल्ले केले. त्यात पहिल्या दिवशी 74 लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, 40 सैनिकांसह 10 नागरिक ठार झाले. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे भारताने यासंदर्भात सावध भूमिका घेतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन सर्व घडामोडींबद्दल गुरुवारी रात्री उशीरा चर्चा झाल्याची माहिती भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिली  आहे.
नक्की काय चर्चा झाली
मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री फोनवरुन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली, असे या फोनवरील चर्चेसंदर्भातील माहिती देणाऱ्या पत्रकारच्या पहिल्या परिच्छेदात म्हटले. यावेळी पुतिन यांनी सध्या घडलेल्या घडामोडींबद्दल पंतप्रधान मोदींना सविस्तर माहिती दिली. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी, ‘रशियाचे ‘नाटो`शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात,` या भूमिकेचा पुनरूच्चार करून हिंसाचार थांबविण्याचे आवाहन पुतिन यांना केल्याचे मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात
म्हटलेय.
‘लोकशाही मार्गाने आणि चर्चेमधून वाटाघाटी करुन हा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत` असेही पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याशी बोलताना सांगितल्याचे मंत्रालयाचे म्हणणं आहे.
अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचा सर्वोच्च प्राधान्य
युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यास भारताचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही मोदी यांनी यावेळी नमूद केले. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या देशांमधील अधिकारी आणि संबंधित व्यक्ती या प्रकरणासंदर्भात सतत संपर्कात राहतील यावर शिक्कामोर्तबही केल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतावर होऊ शकतो गंभीर परिणाम
युक्रेन जगातील सर्वात मोठा शुद्ध सूर्यफूल खाद्यतेल निर्यातदार देश आहे. युक्रेननंतर, या पुरवठ्यात रशियाचा क्रमांक लागतो. दोन देशांमधील युद्ध दीर्घकाळ चालले तर घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सूर्यफूल तेलाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.युक्रेनमधून भारतात खतांचा पुरवठा होतो. तो महागण्याची शक्यता आहे.  तसेच युक्रेनमधून येणाऱ्या मोती, मौल्यवान खडे, धातू रशियातून आयात केले जातात. स्मार्टफोन आणि संगणक बनवण्यासाठी अनेक धातूंचा वापर केला जातो.त्यामुळे सुर्यफूलासह इतर वस्तूंचा तुटवडा जाणवणार व महागाईत आणखी भर पडण्याची शक्यता असून सर्वसामान्यांचे बजेट  कोसळू शकते.
भारताचा सावध पवित्रा
रशियाने युक्रेनमध्ये ‘लष्करी कारवाई`ची घोषणा केल्यानंतर पाश्चात्य देशांमध्ये निषेधाचा सूर उमटला. भारताने मात्र सावध भूमिका घेतली. या घडामोडींबद्दल खेद व्यक्त करणारे निवेदन सरकारने काल सकाळी प्रसृत केले. त्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युरोपीय महासंघातील पदाधिकारी,ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री यांच्यासह अनेकांशी चर्चा करून तोडगा काढण्याबाबत चर्चा केली. मात्र, भारत हा रशियाच्या हल्ल्याचा स्पष्ट शब्दांत निषेध करत नसल्याचे चित्र पाश्चात्य देशांमध्ये निर्माण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here