धुळे / जळगाव : प्रतिनिधी
धुळे जिल्हा सामाजिक, आर्थिक व शैक्षणीकदृष्टया मागासलेला आहे परंतु, विकास साधायचा असेल तर पाणी, वीज, संचार व्यवस्था व रस्ते असले तरच तेथे उद्योग व्यापार येतो. जिथे उद्योग व्यापार वाढतो तिथे विकास होतो. जिथे रोजगार येतो तेथील गरीबी दूर होते. हेच नंदुरबार व धुळे जिल्ह्यात करायचे आहे. याच दृष्टीने येत्या तीन -चार वर्षात दोन्ही जिल्ह्यातील रस्ते हे अमेरिकेच्या दर्जाचे असतील; असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना दिले. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी धुळे व जळगाव शहर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम, प्रकल्पांचे उद्घाटने, कार्यारंभ होवून राजर्षी छत्रपती शाहू नाट्यमंदिरात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले याप्रसंगी ते बोलत होते.
धुळे शहर परिसरात यापुर्वी पाणी टंचाई दिसायची परंतु, आज पाण्याची समस्या जाणवत नाही. बुलढाणा, लातुर, अकोला, वाशिम जिल्ह्यात मोठी मोहिम राबविली. गावातले पाणी गावात, शेतातले पाणी शेतात रहायला हवे. त्यानुसार या भागातील नदी, नाले खोलीकरण करून जलसंवर्धनाचे काम करायच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच धुळ्यात येतांना माझं मन शांत आहे. कारण डॉ. सुभाष भामरे यांनी जी कामे सांगितले होती ती कठीण होती. सुलवाडे जामफल योजना पूर्ण झाली. या योजनेचे काम पूर्ण झाल्याने माझ्या डोक्यावरील ओझं कमी झाल्याचे देखील त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकार महाराष्ट्रात अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी झटत असून सर्वोत्तम दळणवळण, संपर्क यंत्रणा, कार्यक्षमता, शाश्वत विकास आणि सुरक्षेच्या निमिर्तीसाठी कटीबध्द असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचा विडा उचललेला आहे. त्या दिशेने आज त्यांच्याहस्ते धुळे व जळगाव जिल्ह्यातील 4 हजार 14 कोटींच्या 460 कि.मी.लांबीच्या 15 महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपुजन सोहळा आज सकाळी धुळे येथे झाला तर दुसऱ्या टप्प्यात जळगाव येथे आज सायंकाळी हा सोहळा होत आहे.
ना.गडकरी यांच्याहस्ते शेवाळी ते नंदुरबार राष्ट्रीय महामार्ग क्र.753 बी चे दुपदरीकरण, धाडरे गावाजवळील बोरी नदीवर पुल बांधणे तसेच शेवकरी पुतळ्यापर्यंत रस्ता बांधणे व पांझरा नदीवर पुल बांधणे याशिवाय राज्य महामार्ग क्र.9 पासून पावळा-धंडाणे प्र.जि.प्रा.58चे नुतनीकरण याशिवाय रोशमळ खु ते धडगाव कोठाडरोड महामार्ग क्र.8 चे नुतनीकरण, नांद्या – लांबोळारोड प्र.जि.प्रा.35 चे नुतनीकरण, नंदुरबार (कोलदे) – खेतीया राष्ट्रीय महामार्ग क्र.752 जी चे दुपदरीकरण व बोढरे ते धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्र.52 चे चौपदरीकरणाचा शुभारंभ ना.नितीन गडकरी यांच्याहस्ते आज सकाळी करण्यात आला. याप्रसंगी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, आदीवासी विकास मंत्री के.सी.पाडवी, खा.सुभाष भामरे, खा.डॉ.हीना गावीत, आ.अमरिशभाई पटेल, आ.काशीराम पावरा, आ.डॉ.विजयकुमार गावीत, आ.जयकुमार रावल, आ.कुणाल पाटील, आ.राजेश पाडवी, आ.शिरीषकुमार नाईक, जि.प.अध्यक्ष तुषार रंधे, नंदुरबार जि.प.अध्यक्षा सिमा वळवी, धुळेच्या महापौर प्रदिप कर्पे आदींची विशेष उपस्थिती होती.
जळगावात आज सायंकाळी सोहळा
शहरातील शिवतिर्थ मैदानावर सायंकाळी 5 वा. ना.नितीन गडकरी यांच्याहस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण व 70 कोटीच्या विकासकामांचा भूमिपुजन सोहळा होत आहे. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथराव शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, आदीवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी, महसूल ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खा.उन्मेशदादा पाटील, खा.रक्षाताई खडसे, माजीमंत्री आ.गिरीश महाजन, आ.राजुमामा भोळे, जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन, आ.चंदुलाल पटेल, आ.संजय सावकारे, आ.चिमणराव पाटील, आ.शिरीषदादा चौधरी, आ.किशोर पाटील, आ.मंगेश चव्हाण, आ.चंद्रकांत पाटील, आ.अनिल पाटील, आ.लताताई सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती राहील.
ना.नितीन गडकरी यांच्याकडून अपेक्षा
जळगाव शहरातून जाणारा महामार्ग चौपदरीकरण करतांना पाळधी ते तरसोद असे करणे गरजेचे होते, मात्र प्रत्यक्षात फक्त खोटे नगर ते कालिंका माता मंदिर या टप्प्याचे काम करण्यात आले. आकाशवाणी चौक व अजिंठा चौफुली येथील अंडरपास वगळण्यात आले होते. याबाबतची वाढती मागणी लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आता पुन्हा आकाशवाणी चौक व अजिंठा चौफुली या दोन्ही चौकातील सर्कल काढून तेथे अंडरपास करण्याचे प्रस्ताव दिल्लीला पाठविलेले होते. या सोबतच पाळधीते खोटे नगर आणि तरसोद ते कालिंका माता मंदिर या दोन्ही रस्त्यांच्या चौपदरीकरणाच्या कामांचेही प्रस्तावही पाठविण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी हे शिवतिर्थ मैदानावर होणाऱ्या सोहळ्यात या कामाची घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.