कीव्ह : वृत्तसंस्था :युक्रेनची राजधानी किव्ह आणि खार्कीव्ह या पूर्वेकडील प्रमुख शहरांवर ताबा मिळवण्यासाठी रशियन लष्कराकडून मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. मागील आठवड्यामध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. त्यानंतर सुरु असणाऱ्या संघर्षामध्ये रशियन सैन्याचीही आता दमछाक होताना दिसतेय. तरीही रशियन हवाईदलाच्या माध्यमातून बॉम्ब वर्षाव सुरुच आहेत. दरम्यान, सोमवारी युक्रेनने संयुक्त राष्ट्रांसमोर आपली बाजू मांडताना पुतिन यांच्या नेतृत्वाखाली युक्रेनवर युद्ध लादणाऱ्या रशियावर गंभीर आरोप केलेत. आम्ही नागरी वस्तीवर हल्ले करत नसल्याचा दावा करणाऱ्या रशियाकडून रुग्णालये, अनाथाश्रमांवर बॉम्बहल्ले केले जात असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
रहिवाशी ठिकाणांवर हल्ले
रशियन क्षेपणास्त्रे आता आमच्या येथील मोठ्या प्रकल्पांवर, किर्णोत्सर्जन करणाऱ्या वस्तूंचे विघटन करणाऱ्या ठिकाणांवर, उड्डाणपुलावंर, पाण्याच्या साठ्यांवर आणि किव्ह तसेच खार्कीव्हमधील रहिवाशी ठिकाणांवर हल्ला करत आहेत,” असे संयुक्त राष्ट्रांमधील युक्रेनच्या राजदूतांनी म्हटले आहे.
पाच हजार सैनिक मारले
रशियन हल्ल्यानंतर किरणोत्सर्जनाचं प्रमाणही वाढल्याचा दावा युक्रेननं केलाय. “मॉस्कोच्या आदेशाने होणाऱ्या हल्ल्यांमध्ये अनाथाश्रमे, मुलांच्या शाळा, रुग्णालये, रुग्णवाहिकांना लक्ष्य केलं जात आहे. मागील काही दिवसांमध्ये झालेल्या संघर्षात जवळजवळ पाच हजार रशियन सैनिक मारले गेलेत,” असा दावा युक्रेनने केला आहे.
…तर संयुक्त राष्ट्रांचा चेहरा
विस्मरणात जाईल
संयुक्त राष्ट्रांनी रशियाकडे तातडीने कोणतीही अट न घालता सैन्य मागे घेण्यासंदर्भातील मागणी करावी असेही युक्रेनने म्हटले आहे. त्याचप्रमाणे रशियाने डॉनेत्स्क, लुहान्स्क प्रांताना दिलेला राष्ट्रांचा दर्जा काढून त्यांचा आधीप्रमाणे युक्रेनमध्येच समावेश करावा. आता संयुक्त राष्ट्रांनी युक्रेनला मदत केली नाही तर या संघटनेचा चेहरा विस्मरणात जाईल, असा इशाराही युक्रेनने दिला
आहे.
रशियावर निर्बंध
रशियाने युक्रेनच्या आग्नेय झॅपोरिझ्झ्या भागातील बर्दियान्स्क आणि एनरहोदर शहरे तसेच झॅपॉरिझ्झ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या आसपासचा परिसर ताब्यात घेतल्याचे वृत्त इंटरफॅक्स या वृत्त संस्थेने रशियन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले. रशियन सैन्याने दोन लहान शहरे आणि एका अणुऊर्जा प्रकल्पाच्या सभोवतालचा भाग ताब्यात घेतला, असला तरी त्यांना अन्यत्र युक्रेनचे सैन्य जोरदार प्रतिकार करीत आहे. दुसरीकडे, रशियावर अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय महासंघाने आर्थिक निर्बंध लादल्याने त्याचाही फटका रशियन सैन्याला बसत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
मृतांची संख्या किती?
रशियाने आक्रमण केल्यापासून युक्रेनमध्ये सात मुलांसह 102 नागरिकांचा मृत्यू आणि 300 हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी काल दिली.रशियाच्या हल्ल्यातील मृतांची संख्या सांगितली जाते त्याहून अधिक असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली.