साईमत, नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला होता. दरम्यान,खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत इंदोरीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, खंडपीठाचाच निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने इंदोरीकर यांना दणका दिला आहे. त्यामुळे आता इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काय आहे प्रकरण?
इंदोरीकर महाराज यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी शिर्डीतील ओझर येथे कीर्तनादरम्यान केलेल्या निरुपणात ‘सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, इंदोरीकर महाराज यांचे कीर्तनातील हे विधान म्हणजे समाजप्रबोधन अथवा सामान्य विधान नव्हे. तर ती चक्क गर्भिंलग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली होती.