यांनी ठरवलं तर सगळे बंडखोर कायमचे ‘माजी आमदार’ होतील’

0
14

मुंबई: शिवसेना ही संघटना संकटांच्या छातीवर पाय ठेऊन उभी राहिली आहे. जय-पराजय पचवले. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा, असा इशारा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखातून देण्यात आला आहे.

आसामात गेलेल्या लोकांना आमदार-नामदार होता आले. हे सर्व आमदार पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले तर जनता त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. याचे भान या मंडळींना नसेलच असे नाही. त्यामुळे हे शिवसेनेचे आमदार व नामदार पुन्हा स्वगृही परत येतील. प्रवाहात सामील होतील. आज जे भाजपवाले त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहेत ते गरज संपताच पुन्हा कचऱ्यातच फेकून देतील. भाजपची परंपरा तर हीच आहे. त्यामुळे कोणी कितीही जोरबैठका मारत असले तरी वादळ सरेल व आकाश स्वच्छ होईल, अशा आशावाद या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.

या अग्रलेखात एकनाथ शिंदे यांच्या बंडापाठी भाजप असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनाअंतर्गत ज्या घडामोडी सुरू आहेत. त्याच्याशी आपला संबंध नाही वगैरे मखलाशी भाजपने तरी करू नये. सुरतमध्ये ज्या हॉटेलात हे ‘महामंडळ’ होते, तेथे महाराष्ट्रातील भाजपचे लोक उपस्थित होते. पुन्हा सुरतवरून हे लोक आसामला जाताच गुवाहाटी विमानतळावर आसामचे मंत्री स्वागतास हजर होते. यामागचे पेच डावपेच न समजण्याइतकी राज्याची जनता खुळी नाही. हॉटेल्स, विमान, गाडय़ा, घोडे, विशेष सुरक्षा व्यवस्था ही भाजप सरकारचीच कृपा नाही काय?, असा सवाल ‘सामना’तून उपस्थित करण्यात आले आहे.

तसेच शिवसेनेकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांनाही डिवचण्यात आले आहे. आम्हाला तर भारतीय जनता पक्षाच्या नैतिक अधिष्ठानाचे कौतुकच वाटते. कालपर्यंत भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या शिवसेना आमदारांवर हल्ले करणारे, त्यांना थाक दाखवून, “आता तुमची जागा तुरुंगात” असे बोलणाऱ्या किरीट सोमय्यांचे यापुढे कसे होणार? हे सर्व आमदार कालपासून भाजपच्या गोटात शिरले आहेत व दिल्लीतील राजकीय गागाभट्टांनी त्यांना पवित्र, शुद्ध करून घेतले आहे. आता किरीट सोमय्यांना या सर्व शिवसेना आमदारांची पाद्यपूजा करावी लागेल असे दिसते, असा टोलाही ‘सामना’तून लगावण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here