मृग नक्षत्रात आढळणारा लाल किडा होतोय दुर्मिळ….

0
86

 

सोयगाव प्रतिनिधी

ग्रामीण भागात मृगनक्षत्र म्हणजे शेतीची सुरुवात! या नक्षत्राच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये हा किडा बघायला मिळत असल्यामुळे याला मृग नक्षत्राचा किडा किंवा मृगाचा किडा असंदेखील म्हटलं जातं. हा किडा दिसला की पाऊस पडणार अशी धारणा ग्रामीण भागातील लोकांची आहे. त्यामुळेच हा किडा दिसल्यानंतर ग्रामीण भागातील लोक त्याला हळद-कुंकू वाहतात त्याची पूजा करतात. हा किडा जसा ग्रामीण भागासाठी आकर्षणाचा विषय आहे, तसंच शहरी भागात देखील या किड्याने प्रचंड आकर्षण निर्माण केलेला आहे.
या किड्याच्या रचनेवरून आणि दिसण्यावरून याला अनेक नावं ठेवण्यात आलेली आहेत. ह्या किड्याला संस्कृत मध्ये बिर बाहुती, उर्दूत राणी किडा, तेलगू अरुद्रा तर मराठीत काही ठिकाणी गोसावी कीडा असेदेखील म्हटले जात.

वैज्ञानिक दृष्ट्या देखील या किड्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. एकतर अशा प्रजातीचे किडे हे दुर्मिळ असतात. तसं पाहायला गेलं तर या किड्यांमध्ये देखील हजारो वेगवेगळ्या प्रजाती आहेत आणि या प्रजाती संपूर्ण जगभर सापडतात. विशेषतः कॅनडा ते आफ्रिका इथल्या भूभागांमध्ये हे किडे मोठ्या प्रमाणात दिसतात. विविध भूभागांनुसार यांच्या आकारातदेखील फरक पडत असतो‌. या प्रकारचा सापडलेला सर्वात लहान किडा दोन सेंटीमीटर लांबीचा आहे.

या  किड्यांचं आयुष्यमान तसं खूप कमी कालावधीचंच असतं. साधारणपणे दोन ते तीन महिन्यानंतर हे किडे दिसत नाहीत. या किड्यांची मादी ओल्या मातीत अंडी देते आणि साधारणपणे दोन महिन्यांनंतर या अंड्यांमधून लहानलहान किडे बाहेर पडतात. त्यातील लहान वयाचे किडे हे वृद्धांपेक्षा वेगळे असतात. यांचे अन्न भक्षण करण्याची पद्धतदेखील इतरांपेक्षा प्रचंड वेगळी आहे. हे किडे एखादा लहानसा जीव जंतू शोधतात आणि त्यानंतर त्याला मधोमध दंश करुन त्याच्या शरीरातले रक्त पिण्यास सुरुवात करतात. ही सर्व प्रक्रिया चालू असताना तो बळी किडा थोडीफार हालचाल करतो परंतु मृगाच्या बाळकिड्याच्या मजबूत पकडेमुळे बळीकिडा स्वतःचा जीव वाचू शकत नाहीत.
ह्या किड्यांना साधारणपणे आठ पाय असतात. परंतु जोपर्यंत हे किडे तरुण होत नाहीत तोपर्यंत यांना सहा पायच असतात. पुढे तरुण झाल्यानंतर त्यांच्या शरीरात होणारे बदलांसोबत हे जास्तीचे दोन पाय देखील दिसू लागतात. आधीच सांगितल्याप्रमाणे या किड्यांचं आयुष्यमान फारच कमी असते. त्यामुळे पावसाळ्यानंतर हे किडे आपल्याला बघायला देखील मिळत नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here